विद्यापीठाकडे पाचशेहून अधिक शैक्षणिक तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:19 AM2021-02-18T04:19:31+5:302021-02-18T04:19:31+5:30
पुणे : उच्च शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणऱ्या सर्व घटकांच्या विविध अडचणी, समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्याचे उच्च व ...
पुणे : उच्च शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणऱ्या सर्व घटकांच्या विविध अडचणी, समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘उच्च शिक्षण मंत्रालय आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत येत्या गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे प्राप्त झालेल्या पाचशेहून अधिक तक्रारींचे निराकरण सामंत यांच्या उपस्थित विद्यापीठाच्या सभागृहामध्ये केले जाणार आहे.
सामंत यांनी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @’ हा अभिनव उपक्रम कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली विभागापासून सुरू केला. त्याच धर्तीवर आता येत्या १८ फेब्रुवारी रोजी पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक प्रश्न सोडविले जाणार आहेत. पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांचे प्रश्न चर्चा करून सोडविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्यासह शिक्षण विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी पुणे विद्यापीठात सकाळी ११ वाजल्यापासून उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमासाठी तक्रारी किंवा प्रश्न स्वीकारण्यास विद्यापीठाने ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याअंतर्गत विद्यापीठाकडे ५०० हून अधिक तक्रारी प्रात झाल्या आहेत. त्यातील सुमारे २५० तक्रारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी व परीक्षेशी निगडीत आहेत.त्यामुळे या सर्व तक्रारींचे निराकरण शिक्षण विभागाला करावा लागणार आहे. परंतु, एका दिवसात या सर्व तक्रारींना न्याय दिला जाऊ शकतो का? तसेच यावेळी प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे ऐकूण घेणे शक्य होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.