१७ दिवसांत लाखांहून अधिक पुणेकरांचा ई-पाससाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:12 AM2021-05-11T04:12:30+5:302021-05-11T04:12:30+5:30
२७ हजार ५९२ जणांचे अर्ज मंजूर लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात आंतरजिल्हा प्रवासावर बंधने आणल्यानंतर, गेल्या १७ दिवसांमध्ये ...
२७ हजार ५९२ जणांचे अर्ज मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात आंतरजिल्हा प्रवासावर बंधने आणल्यानंतर, गेल्या १७ दिवसांमध्ये १ लाख ५ हजार ७४४ पुणेकरांनी ई-पास मिळविण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात अर्ज केले. त्यापैकी २७ हजार ५९२ जणांचे ई-पास मंजूर करण्यात आले आहे. तब्बल ५७ हजार ९९ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने २३ एप्रिलपासून राज्यात जिल्हांतर्गत प्रवासाला बंदी घातली. अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करायचा असेल तर ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. या वेळी ई-पाससाठी कोविड चाचणी केलेले प्रमाणपत्र जोडण्यास अत्यावश्यक केले आहे. तसेच केवळ जवळच्या नातेवाईकांचे निधन अथवा वैद्यकीय सुविधा अशा कारणांसाठी ई-पास दिला जात आहे. त्यामुळे अन्य कारणासाठी कोणी अर्ज केला असेल. तसेच कोविड प्रमाणपत्र जोडले नसेल, तर ई-पास मंजूर केला जात नाही. त्यामुळे ई-पास नाकारले जात असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले.