पुण्यात महिन्यातले ३ दिवसच लाखांहून अधिक लसीकरण; जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे होते उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 07:51 PM2021-08-29T19:51:11+5:302021-08-29T19:51:38+5:30
लसींचा अपुरा पुरवठा असल्याने दुस-या डोसला प्राधान्य देण्याच्या सूचना
पुणे : पुणे जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट सुरुवातीपासून आखण्यात आले आहे. मात्र, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात केवळ ८ वेळा म्हणजेच एका महिन्यात सरासरी तीनच दिवस एक लाखांहून अधिक नागरिकांना लस मिळू शकली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात दोन दिवशी लाखांहून अधिक लसीकरण झाले होते. लसींचा पुरेसा पुरवठा झाला तरच लसीकरणाचा वेग वाढवणे शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. २५ जून रोजी आजवर सर्वाधिक १ लाख ४१ हजार एवढे लसीकरण झाले आहे.
कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी लसीकरण हाच सध्याचा एकमेव मार्ग आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. १ मार्चपासून सामान्य नागरिकांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. एप्रिलमध्ये दोनदा, जूनमध्ये तीनदा, जुलैमध्ये दोनदा, तर ऑगस्टमध्ये तीनदा एक लाखांहून अधिक लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला सध्या एका महिन्याला १०-१५ लाख लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे दररोज जास्तीत जास्त ५० हजार लसीकरण करणे शक्य होत आहेत. लसींचा जास्त पुरवठा झाल्यास दररोजचे लसीकरण एक लाखांच्या पुढे जाऊ शकणार आहे.
जिल्ह्याला आतापर्यंत २८ जुलै आणि १२ ऑगस्टला अशा दोन दिवशी २ लाखांहून अधिक लसींचा पुरवठा झाला आहे. त्यापूर्वी एप्रिल महिन्यात दीड लाख लसींचे डोस प्राप्त झाले. १९ आणि २८ ऑगस्टला दीड लाखांहून अधिक डोस मिळाले आहेत. लसींचे एक लाखांहून जास्त डोस मिळाल्यावर पुढील दोन दिवस लसीकरणाची संख्या वाढवणेही शक्य होते. त्यामुळे जिल्ह्याला जास्तीत जास्त लसींचा पुरवठा होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
२८ ऑगस्टला दुस-या डोससाठी पुणे जिल्ह्याला १,३१,०२० कोव्हिशिल्ड आणि २५,०७० कोव्हॅक्सिन लसी प्राप्त
दुस-या डोसला प्राधान्य देण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हा लसीकरण यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणत्या जिल्ह्यात किती जणांचे दुसरे डोस घेणे बाकी आहे, याची माहिती एकत्रित करण्यास सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे २८ ऑगस्टला दुस-या डोससाठी पुणे जिल्ह्याला १,३१,०२० कोव्हिशिल्ड आणि २५,०७० कोव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी जिल्ह्यात एक लाखांहून अधिक नागरिकांना डोस मिळू शकणार आहेत.
''जिल्ह्याला अजूनही लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने दररोज एक लाखांचे उद्दिष्ट गाठण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्याला एका महिन्याला १०-१५ लाख लसी मिळतात. त्यामुळे दर दिवशी साधारण ५० ते ६० हजार लोकांचे लसीकरण होऊ शकते. आतापर्यंत दोन वेळा दोन लाखांहून अधिक लसी, तर तीन वेळा दीड लाखांहून अधिक लसी प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यामध्ये लसीकरणासाठी मनुष्यबळ, लसीकरण केंद्रे, साठवणूक क्षमता पूर्ण तयारीने सज्ज आहे. पुरेसा पुरवठा झाल्यास शासकीय आणि खाजगी अशी मिळून १००० लसीकरण केंद्रे सुरु ठेवण्याची आपल्याकडे क्षमता आहे असं पुणे आरोग्य परिमंडळाचे सहायक आरोग्य संचालक डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.