रक्षाबंधनमुळे एसटीला तुडूंब गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 06:34 PM2018-08-25T18:34:41+5:302018-08-25T18:38:44+5:30
रक्षाबंधनानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून एसटी प्रशासनामार्फत काही मार्गांवर जादा एसटी बसेस साेडण्यात येणार अाहेत.
पुणे : रक्षाबंधन सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची एसटीला तुडूंब गर्दी होत आहे. सलग दोन दिवस सुट्ट्यांमुळे यंदा तुलनेने गर्दी अधिक असून एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. शनिवारी प्रवाशांच्या गर्दीनुसार विविध मार्गांवर बस सोडण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रक्षाबंधननिमित्त शहरातून बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या सणासाठी एसटी महांडळाकडून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकणात ठिकठिकाणी जाण्यासाठी जादा बसेस सोडल्या जातात. यंदा रक्षाबंधन हा सण रविवारी आला आहे. तर आदल्या दिवशीही चौथ्या शनिवारमुळे शासकीय सुट्टी, तसेच अनेक शाळांनाही सुट्टी असल्याने बाहेर गावी जाणाऱ्यांच्या संख्येत यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन या बसस्थानकांवर शुक्रवारपासूनच गर्दी झाली आहे. शनिवारी या गर्दीमध्ये आणखी भर पडली असून रविवारी त्यात पुन्हा वाढ होईल. नियमित प्रवाशांच्या तुलनेत बसस्थानकांवर शनिवारी जवळपास दुप्पट गर्दी होती. त्यानुसार नियोजन करण्यात आल्याची माहिती एसटीच्या अधिकाºयांनी सांगितले.
स्वारगेट बसस्थानकातून दादर, बोरीवली, ठाणे, सांगली, बारामती, कोल्हापूर, सोलापूर या मार्गांवरील बसेसला मोठी गर्दी आहे. नियमित बसेसच्या व्यतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा गाड्या सोडल्या जात आहेत.
गर्दी जास्त असल्याने पुणे विभागातील अन्य आगारांच्या सुमारे ३० गाड्या तर पुणे विभागाव्यतिरिक्त इतर विभागाच्या सुमारे १००-१२५ गाड्या स्वारगेट आगाराला देण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या भरून जात आहेत. शिवाजीनगर बसस्थानकातून औरंगाबाद, नाशिक, दादर या मार्गावर जाणाºया गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे. नियमित बसेसच्या तुलनेत १० ते १५ गाड्या जादा सोडण्यात येत आहेत. इतर आगारांकडून १२ जादा गाड्या मागविण्यात आल्या आहेत. यावर्षी सलग दोन दिवस सुट्ट्या आल्यामुळे प्रवाशांर्ची गर्दी वाढली आहे. शुक्रवारपासूनच गर्दी होत असून ही गर्दी सोमवार दुपारपर्यंत कायम राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.