कोरोनापेक्षा ‘सारी’चे रुग्ण अधिक ; ससून रुग्णालयाची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 11:01 AM2020-11-02T11:01:11+5:302020-11-02T11:01:56+5:30
१५ हजाराहून अधिक सारी व अन्य आजाराचे रुग्ण
राजानंद मोरे
पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारातील कोविड रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या सारी व अन्य आजार असलेल्या रुग्णांचेच प्रमाण मोठे असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत रुग्णालयात सुमारे २१ हजारांहून अधिक संशयित रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४ हजार ८०० रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर उर्वरित रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण सारीचे रुग्ण असून इतरांनाही ताप, खोकला अशी लक्षणे होती.
ससून रुग्णालयामध्ये मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्ण दाखल करण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला महापालिका यंत्रणा व खासगी रुग्णालयांमधून रुग्ण पाठविण्यात येत होते. काही दिवसांतच ससूनमध्ये फ्लु ओपीडी सुरू करण्यात आली. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लक्षणे असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात येऊ लागले. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येत होते. ससूनच्या नवीन ११ मजली इमारतीमध्ये लक्षणे असलेल्या पण कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेले रुग्ण अधिक असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आला आहे.
रुग्णालयाच्या अहवालानुसार, दि. ३१ आॅक्टोबरपर्यंत रुग्णालयात सुमारे २१ हजार रुग्ण दाखल झाले आहेत. या सर्वांना कोरोनाचे काही ना काही लक्षणे होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४ हजार ८०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उर्वरीत १५ हजार २०० जण निगेटिव्ह असले तरी त्यांना ‘सारी’ची श्वास घेण्यास त्रास, ताप, खोकला आदी लक्षणे होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार करण्यात आले. त्यापैकी काही रुग्णांना आॅक्सिजन व व्हेंटिलेटरचीही गरज भासली.
------------
‘सारी’ म्हणजे काय?
सिव्हीअर अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस (सारी) म्हणजे श्वसनमार्गाचा संसर्ग. यामध्ये रुग्णाला श्वास घेण्यास त्रासासह ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळतात. हीच लक्षणे कोविडचीही आहेत. त्यामुळे सध्या रुग्णालयांमध्ये दाखल झालेले या लक्षणांचे सर्व रुग्ण कोरोना संशयितांमध्ये पकडले जातात. प्रयोगशाळा अहवाल निगेटिव्ह आलेले व अशी लक्षणे असलेले बहुतेक रुग्ण सारी म्हणून ग्राह्य धरले जातात, असे ससूनमधील तज्ज्ञांनी सांगितले.
----------
ससून कोविड रुग्णालयातील स्थिती (दि. ३१ आॅक्टोबरपर्यंत)
एकुण दाखल रुग्ण - २०,९०९
एकुण कोरोनाबाधित रुग्ण - ४,८४२
एकुण सारी व तत्सम लक्षणे असलेले रुग्ण - १५,२५९
------------------
ससून रुग्णालयात दाखल झालेल्या संशयित रुग्णांमध्ये अधिकाअधिक रुग्ण सारीचे आहेत. तसेच इतर रुग्णांना कोणते ना कोणते लक्षण होते. कोरोना निगेटिव्ह किंवा लक्षणे नसलेले संशयित रुग्ण सुरूवातीपासूनच दाखल करून घेत नाही. लक्षणे असलेले संशयित रुग्ण सर्व विभागातील आहेत. संशयितांसाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. बहुतेक रुग्ण अन्य रुग्णालयांकडून पाठविले जातात. ससूनमधून आलेला रुग्ण उपचाराशिवाय परत पाठविला जात नाही.
- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
-----------------