यंदा कमी दिवसांत अधिक पाऊस, विदर्भात १०० टक्के; जून-जुलैमध्ये खंड पडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 07:06 AM2023-06-03T07:06:51+5:302023-06-03T07:07:25+5:30
१० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात
पुणे : यंदा महाराष्ट्रात सरासरी ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे.
जून-जुलै या दोन महिन्यात कमी पाऊस होईल आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात साधारण पाऊस पडेल, कमी दिवसांत अधिक पावसाचेही प्रमाण वाढणार आहे. विदर्भासाठी मात्र गुड न्यूज असून, तिथे शंभर टक्के पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील हवेच्या दाबामध्ये सतत बदल हाेत आहे. येत्या १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. केरळमध्ये तो दाखल झाल्यावर सतत चार दिवस पाऊस पडला, तर त्याची पुढील वाटचाल चांगली राहील.
शेतकऱ्यांनी अशी पिके घ्यावीत
पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांनी कमी पावसात येणारी मूग, मटकी, चवळी, घेवडा ही पिके घ्यावी. कमी पावसानंतर हरबरा, करडई हे रब्बी हंगामात घेता येतील.