दहा कोटीपेक्षा अधिक बनावट नोटा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:06 AM2020-06-11T08:06:12+5:302020-06-11T08:06:21+5:30
सहाजणांना अटक : पुण्यातील विमाननगर परिसरात कारवाई
पुणे : लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विमाननगर परिसरातील संजय पार्क सोसायटीतील एका घरातून तब्बल दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक आरोपी लष्कराशी संबंधित आहे. उर्वरित पाचजण हवालाचा धंदा करणारे आहे.
शेख अलिम समाद गुलाब खान (वय ३६,रा. प्रतीकनगर येरवडा), सुनील सारडा (४०), अब्दूल गनी रहमत्तुल्ला खान (४३), अब्दुर रहमान अब्दुलगनी खान (१८), रितेश रत्नाकर (३४), आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (२८) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर यातील शेख अलिम खान हा बॉम्बे सॅपर्स डेपो बटालियन खडकी येथे नाईक या पदावर काम करतो. याबाबत उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांनी फिर्याद दिली
आहे.
पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराची गुप्तहेर यंत्रणा आणि गुन्हे शाखा यांना विमाननगर या भागातील एका घरात बनावट नोटांचा व्यापार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
एक खोली भरून नोटांची थप्पी असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी खडकी येथील बॉम्बे सॅपर्समधील एका कर्मचाऱ्यासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवीन दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा भरलेले बॉक्स खोलीभरून आढळून आले. मात्र, या नोटा खेळण्यात वापरण्यासाठी छापल्या असल्याचे त्यावर नमूद केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीत मुंबई व पुण्यातील लोकांचा समावेश आहे.