सोळा हजाराहून अधिक विद्यार्थी शाळेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:02 AM2020-12-02T04:02:31+5:302020-12-02T04:02:31+5:30
पुणे: कोरोनानंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये जिल्ह्यातील सोळा हजाराहून विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात येऊन शिक्षण घेत असून जिल्ह्यातील कोरोना तपासणी करण्यात ...
पुणे: कोरोनानंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये जिल्ह्यातील सोळा हजाराहून विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात येऊन शिक्षण घेत असून जिल्ह्यातील कोरोना तपासणी करण्यात आलेल्या ९ हजार २१२ शिक्षकांपैकी ८२ शिक्षक तर ३ हजार २५७ शिक्षकेतर कर्मचा-यांपैकी १४ शिक्षकेतर कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय 13 डिसेंबर रोजी घेतला जाणार आहे. मात्र, ग्रामीण भागामधील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ४७८ शाळा सुरू झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सांगितले.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ ,मुळशी ,पुरंदर, शिरूर, वेल्हा या १३ तालुक्यांमध्ये इयत्ता नववी व बारावीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या १ हजार १४३ आहे. त्यात शिक्षण घेणा-या एकूण विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ९५ हजार २९ विद्यार्थी आहेत. त्यात अध्यापन करणा-या शिक्षकांची संख्या १२ हजार ८९ आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी शाळेमध्ये येणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी असले तरी शाळेत दररोज येणा-या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी सांगितले.