रेल्वेच्या मदतीला एसटी आली धावून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 05:04 PM2019-07-25T17:04:15+5:302019-07-25T17:06:15+5:30
26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान मुंबई मार्गावर लाेणावळा ते कर्जत मार्गावर दुरुस्तीचे काम रेल्वेकडून करण्यात येणार असल्याने अनेक महत्त्वाच्या रेल्वे बंद असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या साेयीसाठी एसटीच्या जादा बसेस साेडण्यात येणार आहेत.
पुणे : मुंबई मार्गावर लाेणावळ ते कर्जत या मार्गावर रेल्वे कडून तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान अनेक महत्त्वाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात डेक्कन व प्रगती या रेल्वेंचा देखील समावेश आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या नाेकरदारांची तसेच प्रवाशांची संख्या अधिक आहे. रेल्वे बंद असल्यामुळे या प्रवाशांचे हाल हाेणार आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. रेल्वे बंदच्या काळात प्रवाशांच्या साेयीसाठी पुणे स्टेशन, स्वारेगट येथून 25 तर, लाेणावळा येथून 10 जादा बसेस साेडण्यात येणार आहेत.
मुंबई मार्गावरील लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून 26 जुलै ते 9 ऑगस्ट पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती या महत्वाच्या गाड्यांसह इतर काही गाड्या रद्द राहणार आहेत. या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी राज्य परिवहन (एसटी) तर्फे जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या काळात प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्यास गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल अशी माहिती एसटी अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे.