Maharashtra: आगाऊ नोंदणी केलेल्या १८ हजारांहून अधिक जणांना लोकसभेसाठी करता येणार मतदान

By नितीन चौधरी | Published: January 24, 2024 04:44 PM2024-01-24T16:44:07+5:302024-01-24T16:45:13+5:30

राज्यात अशा ५४ हजारांहून अधिक जणांनी आगाऊ नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे...

More than 18,000 pre-registered people can vote for Lok Sabha | Maharashtra: आगाऊ नोंदणी केलेल्या १८ हजारांहून अधिक जणांना लोकसभेसाठी करता येणार मतदान

Maharashtra: आगाऊ नोंदणी केलेल्या १८ हजारांहून अधिक जणांना लोकसभेसाठी करता येणार मतदान

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. मात्र, यादीचे अद्ययावतीकरण सुरू राहणार असून आगाऊ नोंदणी केलेल्या १८ हजारांहून अधिक मतदारांचा १ एप्रिल रोजी मतदार यादीत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. राज्यात अशा ५४ हजारांहून अधिक जणांनी आगाऊ नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या तरुणांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे. यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या बहुअर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी करता आली आहे. त्यानुसार राज्यात पूर्वनोंदणीचे एकूण ५४ हजार २६३ अर्ज आले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानुसार १ एप्रिल पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्यांचा मतदार यादीत समावेश केला जाणार आहे. राज्यात अशा आगाऊ नोंदणी केलेल्या १८ हजार ८३२ जणांचा मतदार यादीत समावेश केला जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. तर १ जुलै रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या १७ हजार ६५९ जणांचा, १ ऑक्टोबर रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या १७ हजार ७७२ जणांचाही त्यानंतर यादीत समावेश केला जाणार आहे. या पूर्वनोंदणी केलेल्या तरुणांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.
-----------

११ लाख ६० हजार ६९६ मृत मतदारांची नावे वगळली
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार राज्यातील ११ लाख ६० हजार ६९६ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यांपैकी ऐंशीपेक्षा अधिक वय असलेले ४ लाख ९२ हजार ३९५ मतदार मृत झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांची नावेही वगळण्यात आलेली आहेत. राज्यातील सर्वाधिक १ लाख ७ हजार १९८ मृतांची नावे सोलापूर जिल्ह्यात वगळण्यात आली आहेत. तर सातारा जिल्ह्यात ९१ हजार ४७० तर ८४ हजार ३४६ मृतांची नावे पुणे जिल्ह्यात वगळण्यात आली आहेत. सर्वात कमी वगळलेली ८ हजार ४२७ मृतांची नावे हिंगोली जिल्ह्यातील आहेत.

------
एकसारखे फोटो, नावे तपशील असणारी नावे वगळली

मतदार याद्यांमध्ये ९ लाख ५ हजार ५५९ एकसारखे फोटो असलेले मतदार असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत २ लाख ८४ हजार ६२० मतदारांच्या नावे वगळली आहेत. मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले २ लाख ५४ हजार ४६० मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून ७४ हजार ४२६ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत.
कोट
नाव वगळल्यामुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झाली आहे.

- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

Web Title: More than 18,000 pre-registered people can vote for Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.