Pune Railway: पुणे रेल्वे विभागात १९ हजारांहून अधिक लोकांचा विनातिकीट प्रवास; तब्बल १ कोटींचा दंड वसूल
By नितीश गोवंडे | Published: August 4, 2022 12:30 PM2022-08-04T12:30:05+5:302022-08-04T12:30:17+5:30
विनातिकीट प्रवास केल्यास रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो
पुणे : पुणेरेल्वे विभागात जुलै महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान १९ हजार ८२९ लोक विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १ कोटी ५० लाख १६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
तसेच ५४५ जणांना अनियमित प्रवासासाठी २ लाख ८८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १८१ जणांकडून २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १ लाख २५ हजार केसमध्ये ८ कोटी ५७ लाख ६८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सतत सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले.