बसच्या फुकट्या प्रवाशांकडून ७६ लाखांहून अधिक दंड वसूल! १० महिन्यांत १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 04:18 PM2024-11-28T16:18:15+5:302024-11-28T16:18:56+5:30
पीएमपीच्या महामंडळाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून दंड आकारणी केली जाते, तरीही हा प्रकार कमी होत नाही.
पुणे : पीएमपीच्या वारंवार प्रयत्नांनंतरही बसमध्ये मोठ्या प्रमाणावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुळसुळाट सुरूच आहे. पीएमपीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या दरवर्षी एक नवा विक्रम नोंदवत आहे.
महामंडळाने १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार १० महिन्यांच्या कालावधीत तब्बल १५ हजारांहून अधिक प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला असून, पीएमपीने प्रवाशांकडून दंड स्वरूपात ७६ लाख रुपयांहून अधिक रक्कम वसूल केली आहे.
पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना त्वरित दंड आकारण्यात येतो. हा दंड ५० रुपये ते ५०० रुपये इतका असतो. तरीही काही प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास करण्याचे प्रकार कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून आले आहे.
प्रवाशांमध्ये बेफिकिरी का?
सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पीएमपी अधिक सक्षम झाली पाहिजे. पीएमपीकडून किफायतशीर दरात सेवा दिली जाते, मात्र तरीही काही प्रवासी नियमांकडे दुर्लक्ष करतात. महामंडळाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून दंड आकारणी केली जाते, तरीही हा प्रकार कमी होत नाही. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे व दंड टाळावा.
१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर कालावधीत विनातिकीट प्रवासी संख्या -१५ हजार ३४०
दैनंदिन दंडवसुली - २५ हजार २३० रुपये
१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत एकूण दंड वसुली- ७६ लाख ७० हजार
दररोज सरासरी ६५ प्रवासी करतात विनातिकीट प्रवास
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज सरासरी ६५ ते ७० जण विनातिकीट प्रवास करतात. या आकडेवारीनुसार दररोज सरासरी २५ हजारांपेक्षा अधिक रुपयाची दंड वसुली पीएमपीकडून होत असते.
तिकीट हरवले तरी ५०० रुपये दंड
पीएमपीकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना ५० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही तिकीट काढले; पण तपासणी वेळी ते हरवले तरी ५०० रुपये दंड भरावा लागतो.