Maharashtra Rain Update: राज्यात जून, जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस! पुढील २ महिन्यात 'या' भागात कमी पावसाचा अंदाज
By श्रीकिशन काळे | Published: August 1, 2024 06:26 PM2024-08-01T18:26:16+5:302024-08-01T18:26:42+5:30
हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर केला आहे
पुणे : राज्यामध्ये जून, जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. तर येत्या दोन महिन्यात विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (दि. १) दिला. ऑगस्ट महिन्यामध्ये देशामध्ये सरासरी पाऊस पडेल, परंतु देशातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा अंदाज गुरुवारी (दि. १) जाहीर केला. ते म्हणाले, यंदा देशामध्ये जून आणि जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १.८ टक्के अधिक राहिले. तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा १८.४ टक्के पाऊस झाला. पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये सरासरीपेक्षा १८.९ टक्के कमी पाऊस झाला तसेच मध्य भारतात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १६.८ टक्क्यांनी जास्त होते. दक्षिण भारतात सरासरीपेक्षा २६.७ टक्क्यांनी अधिक पाऊस झाला.
या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर केला. देशाच्या बहुतांशी भागात या दोन्ही महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील. मात्र ईशान्य आणि शेजारच्या पूर्व भारत, लडाख, सौराष्ट्र आणि कच्छ तसेच मध्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात देशात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मात्र देशातील अनेक भागात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, असेही संकेत दिले. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील अनेक भागात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
जुलै महिन्यात अधिक पाऊस
देशात जून ते जुलै महिन्यात सरासरी पाऊस ४४५.८ नोंदवला जातो. प्रत्यक्षात यंदा ४५३ मिमी पाऊस झाला आहे. १.८ टक्के अधिक पाऊस झाला. तर जून महिन्यात सरासरी १६५ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात १४७ मिमी नोंदवला गेला. १० टक्के पाऊस कमी झाला. तर जुलै महिन्यात सरासरी पाऊस २८० मिमी होतो, प्रत्यक्षात ३०५ मिमी पाऊस झाला असून, ९ टक्के अधिक आहे.