पुणेकरांपेक्षा झाडे जास्त... पण ठराविक भागच हिरवागार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 12:58 PM2019-08-02T12:58:34+5:302019-08-02T13:05:44+5:30
पुणे शहरात माणसांपेक्षा झाडे जास्त असल्याची शुभवार्ता आहे
पुणे : महापालिकेच्या वतीने शहराचा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल सन २०१८-१९ जाहीर केला आहे. यामध्ये जीआयएस प्रणालीद्वारे वृक्षगणना केली असून, यात पुणे शहरात माणसांपेक्षा झाडे जास्त असल्याची शुभवार्ता आहे. पालिकेने सन २०१८-१९ च्या पर्यावरण अहवालात दिलेली माहिती खरी असेल, तर पुण्यात तब्बल ४१ लाख ९४ हजार ६२३ झाडे डोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) आणि जीपीएस (वैश्विक स्थान निश्चिती) द्वारे झाडांची ही मोजदाद झालेली आहे. धनकवडी-सहकारनगर परिसर शहरात सर्वाधिक गर्द झाडीने नटलेला आहे, तर सर्वांत कमी झाडे भवानी पेठेत आहेत.
पर्यावरण संदर्भातील सद्य:स्थिती मांडणारा अहवाल दरवर्षी सादर होतो. यात हवा, पाणी, ध्वनिप्रदूषणाचा आढावा घेतला जातो. ४१८ प्रकारांच्या वृक्ष प्रजाती आहे. यातल्या १११ प्रजाती दुर्मिळ वृक्षांच्या आहेत. सहकारनगर-धनकवडी १० लाख ५३ हजार १४४ वृक्ष, वडगाव शेरी-नगररोड, कोथरुड-बावधन परिसरात सर्वाधिक वृक्ष, तर कसबा-विश्रामबाग परिसरात ३२ हजार १६२ वृक्ष आहेत, तर भवानी पेठेत सर्वांत कमी १२ हजार ४७४ वृक्ष आहे.
..........
शहरातील वृक्षगणनेची माहिती पुढीलप्रमाणे-
एकूण वृक्षांची संख्या : ४१ लाख ९४ हजार ६२३
वृक्षांची एकूण प्रजाती : ४१८
सर्वांत जास्त संख्य असलेली वृक्ष प्रजाती : गिरिपुष्प
उपयुक्ततेनुसार शहरातील वृक्षांची संख्या
इमारती लाकूड : १३ लाख ५७ हजार ५८
सरपण योग्य वृक्ष : ८ लाख ३५ हजार ९८७
शोभेची झाडे : ५ लाख ६३ हजार ४१९
औषधी झाडे : ४ लाख २५ हजार ८४४
शहरातील फळधारी वृक्षांची संख्या
आंबा : ४३ हजार ८०३
नारळ : ४१ हजार २३७
सीताफळ : १७ हजार ३५७
जांभूळ : १४ हजार ८०७
पेरू : १४ हजार ७६८
...........
दुर्मिळ वृक्ष
पुण्यात देशी-विदेशी १११ दुर्मिळ वृक्ष प्रजाती आहेत. यात गोरखचिंच, दालचिनी, शिवलिंगी (विदेशी), कुंभ, भोकर, मणीमोहर, दुरंगी बाभूळ, अजान, मेडशिंगी, अंजनी, काळा पळस, रुद्राक्ष, गुळवेल
(देशी) आदी प्रजातींचा समावेश आहे.
......