देशात अडीच हजारांहून अधिक कोरोना संशयितांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 03:01 AM2020-02-19T03:01:52+5:302020-02-19T03:02:24+5:30
केरळमधील तीन प्रवासी : ६६ जणांचे प्रयोगशाळा नमुने आले निगेटिव्ह
पुणे : चीनसह अन्य कोरोना विषाणुबाधित देशांतून भारतात परतलेल्या २ हजार ६३८ प्रवाशांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने प्रयोशाळांमध्ये तपासण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ तीन प्रवाशांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यातील दोघांना घरी सोडण्यात आले आहे.
चीनसह अन्य बाधित देशांतून १ ते १७ जानेवारी या कालावधीत भारतात आलेल्या प्रवाशांचाही पाठपुरावा सुरू करण्यात आला. त्यानुसार १८ फेब्रुवारीपर्यंत देशभरातील एकूण २ हजार ६३८ प्रवाशांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) सह देशातील अन्य काही प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले. त्यापैकी केरळमधील तीन प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
उर्वरीत सर्व प्रवाशांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. नमुने तपासण्यात आलेल्या एकुण प्रवाशांपैकी १३०८ प्रवासी हे चीनमधील वुहान येथून आणण्यात आलेले आहेत. उर्वरीत १३३० प्रवासी हे देशभरातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले होते. त्यांच्यापैकी ३ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली होती.
दोघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उर्वरीत प्रवाशांचे नमुनेही निगेटिव्ह आले आहेत.
राज्यात ६६ जणांची तपासणी
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बाधित भागातून २२८ प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ७० जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ६६ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यानुसार ६५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.