दोन हजारांहून अधिक खाटा कोरोनाग्रस्तांसाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:05+5:302021-02-24T04:12:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता, पुणे महापालिकेने शहरातील ८४ खासगी रुग्णालयांतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता, पुणे महापालिकेने शहरातील ८४ खासगी रुग्णालयांतील दोन हजारांहून अधिक खाटा कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत़ तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रूग्णाला उपचार नाकारून खाजगी रूग्णालयांनी परत पाठवू नये, असे आदेशही जारी केले आहेत़
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत शहरातील खासगी रुग्णालय प्रमुखांची बैठक मंगळवारी पार पडली़ या बैठकीत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या खाटांची उपलब्धता दर्शविणाऱ्या ‘डॅश बोर्ड’वर ज्या खासगी रुग्णालयांचा तपशील आहे, त्या रुग्णालयांना कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी तत्काळ खाटा उपलब्ध करून देण्याबाबत सांगण्यात आले आहे़ कोरोना आपत्तीचा प्रभाव जास्त असताना या रुग्णालयांमधील साध्या, आयसीयू, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर अशा सुमारे पाच हजार खाटा महापालिकेने आरक्षित केल्या होत्या़ त्यापैकी आजमितीला ५० टक्के खाटा लागलीच कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यास सांगण्यात आले आहे़
कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी महापालिकेच्या व शासनाच्या विविध रूग्णालयांमधील साधरणत: दीड हजार व खाजगी रूग्णालयांतील दोन हजार अशा साडेतीन हजार खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत़ या सर्वांची उपलब्धतेची माहिती ‘डॅशबोर्ड’वर बुधवारी सायंकाळपर्यंत भरण्यात (अपडेट) येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ़ आशिष भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़
----------------------------
क्वारंटाईन सेंटरही सुरू
दिवसागणिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खराडी-रक्षकनगर, पठारे स्टेडियम व गणेश कला क्रीडा रंगमंच येथील सभागृह असे तीन क्वारंटाईन सेंटर (विलगीकरण कक्ष) बुधवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ या तीनही ठिकाणी ५५० कोरोनाबाधित रूग्णांना विलग ठेवता येईल अशी व्यवस्था उभी करण्यात आली आहे़
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, अनेक रूग्ण हे लक्षणेविरहित असल्याने यापैकी बहुतांशी रूग्ण घरी विलगीकरणास प्राधान्य देत आहेत़ त्यामुळे अद्यापपर्यंत महापालिकेकडे विलगीकरणासाठी कोणीही मागणी केलेली नसल्याचेही डॉ़ भारती यांनी सांगितले़
--------------------------