भोरच्या शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:34+5:302021-07-02T04:09:34+5:30
भोर : भोर तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही पारंपारिक पध्दतीने शेती करतात. मात्र त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पन्न कमी होते. ...
भोर : भोर तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही पारंपारिक पध्दतीने शेती करतात. मात्र त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक पध्दतीने शेती करावी असे प्रतिपादन भोर पंचायत समितीचे उपसभापती लहुनाना शेलार यांनी केले.
भोर पंचायत समितीच्या सभागृहात एक जुलै कृषि दिन
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषि विभाग, पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती भोर व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. त्यावेळी शेलार बोलत होते.
कृषि दिन कार्यक्रमासाठी सभापती पंचायत समिती भोर दमयंती जाधव, उपसभापती लहुनाना शेलार, तालुका कृषि अधिकारी हिरामण शेवाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी कुलदिप बोंगे, कृषि अधिकारी शरद धर्माधिकारी, मंडळ कृषि अधिकारी शरद सावंत, राजेंद्र डोंबाळे, विस्तार अधिकारी शिवराज पाटील, चांदगुडे तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे व शेतकरी उपस्थित होते.
सभापती पंचायत समिती भोर श्रीमती दमयंतीताई जाधव यांनी कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तालुका कृषि अधिकारी हिरामण शेवाळे यांनी कृषि दिनाचे महत्व व कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन मंडळ कृषि अधिकारी राजेंद्र डोंबाळे यांनी केले.