पाण्याच्या शोधार्थ मोरांची भटकंती

By admin | Published: April 19, 2017 04:12 AM2017-04-19T04:12:01+5:302017-04-19T04:12:01+5:30

आंबळे, कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) परिसरात पाणीसाठे संपुष्टात आल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मोरांची वणवण सुरू झाली आहे

Morse wandering in search of water | पाण्याच्या शोधार्थ मोरांची भटकंती

पाण्याच्या शोधार्थ मोरांची भटकंती

Next

न्हावरे : आंबळे, कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) परिसरात पाणीसाठे संपुष्टात आल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मोरांची वणवण सुरू झाली आहे. दरम्यान, या परिसरातील मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील आंबळे, आनोसेवाडी, मोटेवाडी, गोलेगाव, भोसवाडी, थेऊरकरवाडी, दहीवडी, पारोडी, भांबर्डे या परिसरात अनेक वर्षांपासून मोरांचे अस्तित्व आहे. दहा वर्षांपूर्वी या भागात चासकमान प्रकल्पाचे पाणी फिरल्याने मोरांना पिण्याचे पाणी, नैसर्गिक खाद्य उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे या भागात दिवसेंदिवस मोरांची संख्या वाढू लागली आहे.
काही दिवसांपासून या भागातील लघुपाटबंधारे, पाझर तलाव,
ओढे, नाले आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोरांना रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. त्याचबरोबर सध्या या भागात मोरासाठीचे नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारे खाद्यही संपुष्टात आले आहे. बहुतेक शेतकरी आपल्या घरातील धान्य मोरांसाठी खायला टाकतात. या भागात मोर, पक्षी इतके माणसाळलेले आहेत की, त्यांचा वावर शेतकऱ्यांच्या शेतापाासून जनावरांच्या गोठ्यापर्यंत, एवढेच नाही तर अगदी घरापर्यंत असल्याचा दिसून येतो.(वार्ताहर)


या भागातील शेतकरी आपल्या घरातील अन्नधान्य मोरांना खाण्यासाठी टाकतात. तसेच, काळजीने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. मात्र, मोरांबाबत काही दुर्घटना घडल्यास त्याचा वनविभागाकडून होणारा नाहक बडगा अथवा कारवाईचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
मोरांना अन्नपाणी पुरवताना शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, मोर आपल्या परिसराचे एक वैभव आहे.
या भावनेपोटी कसल्याही कारवाईच्या भीतीला न जुमानता आपण मोरांना अन्नधान्य पुरवतो, असे येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, या भागातील मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक संस्था व वनविभाग पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Web Title: Morse wandering in search of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.