CoronaVirus News: पुण्यात मृत्यूदर अद्यापही पाच टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 02:40 AM2020-05-30T02:40:18+5:302020-05-30T02:40:23+5:30
शहरातील रुग्ण संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांच्या तपासणीवर भर दिला आहे. दिवसाकाठी एक ते दीड हजाराच्या दरम्यान ‘स्वाब टेस्टिंग’ केले जात आहे. पुण्यात दर दहा लाख लोकांमागे ५ हजार, ७५३ तपासण्या होत असून रुग्ण निदानाचे प्रमाण ८ टक्के आहे. राज्यात सर्वाधिक चाचण्या मुंबईमध्ये होत असून त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे.
शहरातील रुग्ण संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. सुरुवातीच्या काळात कोरोना तपासण्यांचे प्रमाण अत्यंत जुजबी होते. हे प्रमाण वाढवत नेले. त्यानंतर, शहरातील अतिसंक्रमित भाग आणि अन्य असे दोन भाग केले. कंटेन्मेंट भागासह सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागात तपासण्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली. त्यामुळे पालिका दरदिवशी शेकड्यात करीत असलेल्या चाचण्यांचा आकडा हजाराच्या पुढे गेला आहे.
राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे ७ हजार ९७ जणांची तपासणी केली जात असून रुग्ण निदानाचे प्रमाण २३ टक्के आहे. ठाण्यात ६ हजार ९३९ रुग्ण असून दर दहा लाखांमागे ३ हजार १४१ तपासण्या केल्या जात आहेत. ठाण्याचे रुग्ण निदानाचे प्रमाण १८ टक्के आहे.
पुण्यातील रुग्णसंख्या ५ हजार ८१५ झाली असून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३ हजार २६४ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांवर आहे. प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २९४ आहेत. हे प्रमाण रुग्ण संख्येच्या ४० टक्के आहे.