इंदापूरची हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच, शौचालयाचा वापर नगण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:05 AM2017-10-03T05:05:33+5:302017-10-03T05:05:36+5:30
ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली
अकोले : ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली. यामुळे गावोगावी शौचालयांची संख्या वाढली आहे. मात्र, याचा वापर नगण्य होत असल्याने प्रत्यक्षात ग्रामीण भागातील हगणदारीमुक्तीचे चित्र केवळ कागदावरच राहिले असल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील गावोगावी उघड्यावरील हगणदारी वाढत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे रूप पालटले नसल्याचे पाहायला मिळत आहे.
केंद्र शासनाने २००५ पासून पुन्हा निर्मल ग्राम योजना सुरु करून यामध्ये शौचालय बांधणाºया प्रत्येक कुटुंबाला पाचशे रुपये अनुदान देण्यात येत होते. महत्त्वाचे म्हणजे २००८ पासून निर्मलग्राम अभियानाची व्याप्ती वाढली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात आले. या अभियानांतर्गत काही ग्रामपंचायतींना पुरस्कारदेखील मिळाला. तेव्हापासून ग्रामीण भागातील हगणदारीचे चित्र पालटायला सुरुवात झाली. सन २००९ पासून शौचालयासाठी मिळणाºया अनुदानात वाढ होऊन लाभार्थ्याला अनुदान देण्यात येत होते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात गावे हगणदारीमुक्त होण्यास विलंब होऊ लागल्याने सन २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्याने शौचालयासाठी बारा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. अनुदानात वाढ झाल्याने ग्रामीण भागात शौचालयांची संख्या वाढली मात्र, त्या प्रमाणात वापर होत नाही.