ग्राहकाने तारण ठेवलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:20+5:302021-01-25T04:10:20+5:30
- बँक कर्मचारी महिलेसह दोघे अटकेत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्राहकाने तारण ठेवलेल्या ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने ...
- बँक कर्मचारी महिलेसह दोघे अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्राहकाने तारण ठेवलेल्या ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास दिले असता बँकेतील तरुणीनेच ते लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आपटे रस्ता भागातील एका बँकेतील कर्मचारी तरुणीसह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
याबाबत बँकेचे तारण विभागातील व्यवस्थापक अतुल घावरे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बँक कर्मचारी तरुणी आणि तिच्या बहिणीच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती आपटे रस्त्यावरील एका बँकेत कर्मचारी आहे. एका ग्राहकाने बँकेकडून सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. ग्राहकाने बँकेकडे ४० लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तारण ठेवले होते. संबंधित दागिने बँकेकडे दिल्यानंतर ते लॉकरमध्ये ठेवण्याची जबाबदारी बँक कर्मचारी तरुणीकडे देण्यात आली होती. ८ जानेवारी रोजी युवतीने लॉकरमधील दागिने चोरले. दरम्यान, लॉकरमधील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर शोध घेण्यात आला. कर्मचारी युवतीची चौकशी करण्यात आली. तेव्हा दागिने चोरल्याची कबुली तिने दिली. चौकशीत कर्मचारी युवतीने दागिने चोरल्यानंतर तिच्या बहिणीच्या पतीकडे ठेवण्यास दिले. त्याला दागिने मोडण्यास सांगितले. त्यापैकी काही दागिने मोडून पैसेही मिळाले. पोलिसांनी उर्वरित दागिने आणि रोकड जप्त केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लंबे तपास करत आहेत. याप्रकरणात दोघांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
---