मोशीत पोलिसांनी रोखला बालविवाह
By admin | Published: December 1, 2014 03:40 AM2014-12-01T03:40:58+5:302014-12-01T03:40:58+5:30
पंधरा आणि चौदा वर्षांच्या मुला-मुलींचा मोशी येथे विवाह लावण्याचा प्रयत्न रविवारी एमआयडीसी पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थाला अटक केली
पिंपरी : पंधरा आणि चौदा वर्षांच्या मुला-मुलींचा मोशी येथे विवाह लावण्याचा प्रयत्न रविवारी एमआयडीसी पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थाला अटक केली असून, नियोजित वधू-वरांचे आजोबा पसार झाले आहेत. तिघा आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
जितू राजपूत (वय २३, रा. धानोरी फाटा, आळंदी) असे अटक केलेल्या मध्यस्थीचे नाव आहे. वधूचे आजोबा व वराचे आजोबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही पसार आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेली माहिती अशी : तिन्ही आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ११ नुसार दाखल करण्यात आला आहे. मोशी येथे बालविवाह होणार असल्याची माहिती रविवारी सकाळी पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलीस बोरहाडेवाडी परिसरात गेले. तेथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारासमोरील मैदानात मंडप टाकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशी केली असता केवळ साखरपुडा होणार असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस तेथून निघून गेले.
दुपारी एकच्या सुमारास पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीने बोरहाडेवाडी परिसरात निर्जनस्थळी बालविवाह होणार असल्याचे एमआयडीसी पोलिसांना दूरध्वनीवरून सांगितले. त्यानंतर पोलीस पुन्हा बोऱ्हाडेवाडीकडे
गेले. तेथे एका झाडाखाली विवाह सुरू होता. त्याठिकाणी दोनशेपेक्षा अधिक लोक जमा झाले होते. पोलीस जवळ येताच उपस्थितांनी पळ काढण्यास सुरूवात केली. पोलिसांनी मध्यस्थ जितू राजपूत याला अटक केली. मात्र, वधू-वराचे नातेवाईक पसार झाले. जितूकडे कसून
चौकशी केली असता बालविवाह लावण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्याने दिली. (प्रतिनिधी)