इंद्रायणीनगर उद्यानात डासांचा प्रादुर्भाव; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:02 IST2024-12-20T15:54:51+5:302024-12-20T16:02:04+5:30
नागरिक आरोग्याच्या भीतीने उद्यानात येणे, टाळत असल्याची चर्चा आहे.

इंद्रायणीनगर उद्यानात डासांचा प्रादुर्भाव; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
इंद्रायणीनगर : येथे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सेक्टर तीनमध्ये उद्यान उभारले आहे. उद्यानातील तळे अस्वच्छ झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सेक्टर तीनमध्ये सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून उद्यान उभारले. पुढील देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेकडे हस्तांतरण केले. मात्र, महापालिकेचे उद्यानाकडे दुर्लक्ष होत आहे. उद्यानातील गवत व तलावातील अस्वच्छ पाण्यामुळे येथे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक आरोग्याच्या भीतीने उद्यानात येणे टाळत असल्याची चर्चा आहे.
महापालिका कर्मचारी आठवड्यातून दोन वेळा औषध फवारणी करीत असतात. त्यातूनही डासांचा प्रादुर्भाव अधिक असेल तर आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येतील. - तानाजी दाते, सहायक आरोग्य अधिकारी, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय
डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार करून माहिती देण्यात येईल. पाठपुरावा करून आरोग्य विभागाकडून औषध फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव कमी करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबविण्यात येईल. - उमेश ढाकणे, उपायुक्त, उद्यान विभाग
संध्याकाळच्या वेळी आम्ही नियमित उद्यानात जात असतो; परंतु अलीकडच्या काळात उद्यानात डासांचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. डासांमुळे उद्यानात निवांत बसणेही कठीण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. - श्वेता मोरे, रहिवासी
तलावातील अस्वच्छ पाणी व प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे उद्यानात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उद्यानात जावे की जाऊ नये, असा प्रश्न आम्हाला आता पडत आहे. - संतोष पाटील, रहिवासी