देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:20 AM2021-03-13T04:20:39+5:302021-03-13T04:20:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असून सक्रिय रुग्णही वाढले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असून सक्रिय रुग्णही वाढले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी (दि. १२) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या असलेल्या देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्हे आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्येत पुणे जिल्हा देशात क्रमांक एकवर असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च २०२० रोजी आढळून आला. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत पुण्यात रुग्णसंख्या उच्चांकी स्तरावर गेली होती. परंतु, ऑक्टोबरनंतर रुग्णसंख्या कमी होत गेली होती. जानेवारीत सर्वात कमी रुग्णसंख्या होती. परंतु, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा फुगत चालल्याने प्रशासकीय पातळीवरुन उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. तर, औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये काही निर्बंध घालण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत हा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात १८ हजार ४७४ सक्रिय रुग्ण असून हा देशातील सर्वाधिक आकडा आहे. तर, त्याखालोखाल असलेल्या नागपूर जिल्ह्यात १२ हजार ७२४ सक्रीय रुग्ण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ठाणे आणि चौथ्या क्रमांकावर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या प्रथम दहा जिल्ह्यांत बेंगळुरू (कर्नाटक) आणि एर्नाकुलम (केरळ) ही दोन शहरे वगळता उर्वरीत आठही जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यात अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांचाही समावेश आहे.
चौकट
देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण जिल्हे
जिल्हा ---रुग्णसंख्या
पुणे ---१८ हजार ४७४
नागपुर ---१२ हजार ७२४
ठाणे ---१० हजार ४६०
मुंबई ----९ हजार ९७३
बंगळुरू ----५ हजार ५२६
एर्नाकुलम ---५ हजार ४३०
अमरावती ----५ हजार २५९
जळगाव ----५ हजार २९
नाशिक ----४ हजार ५२५
औरंगाबाद ------४ हजार ३५४