तलाठी भरतीसाठी पुण्यातून सर्वाधिक अर्ज; उद्यापासून परीक्षेला प्रारंभ
By प्रशांत बिडवे | Published: August 16, 2023 08:19 PM2023-08-16T20:19:48+5:302023-08-16T20:20:57+5:30
राज्यात टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीमार्फत तलाठी भरती २०२३ परीक्षेचे आयाेजन केले आहे.
पुणे: राज्याच्या महसूल विभागाच्या गट - क संवर्गातील तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. तलाठी पदासाठीच्या ४ हजार ६४४ जागांसाठी सुमारे साडेदहा लाख उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक १ लाख १४ हजार ६८४ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तर वाशिम जिल्ह्यातून सर्वात कमी २ हजार ६३६ अर्ज आले आहेत. उद्यापासून तलाठी भरती परीक्षेला प्रारंभ हाेणार असून दि. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यात टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीमार्फत तलाठी भरती २०२३ परीक्षेचे आयाेजन केले आहे. तलाठी परीक्षेसाठी राज्यातील ३६ जिल्ह्यातून तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक अर्ज आलेल्या पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये पुणे पाठाेपाठ रायगड १ लाख ५३७ आणि नाशिक ६८ हजार ३८ यांचा क्रमांक लागताे. यासह अहमदनगर ६१ हजार ६३३, साेलापूर ५८ हजार ९७७, चंद्रपूर ५६ हजार ९३०, बीड ४८ हजार ७७२, जळगाव जिल्ह्यांत ४८ हजार ३३६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
तीन जिल्ह्यांत सर्वात कमी अर्ज
सर्वात कमी अर्ज आलेल्या जिल्ह्यांत वाशिम नंतर मुंबई शहर ३ हजार ७९३ आणि अकाेला ६ हजार ४०४ अर्ज आले आहेत.
पुण्यात ११ केंद्रांवर हाेणार परीक्षा
पुणे जिल्ह्यांत तलाठी भरतीसाठी दि. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत परीक्षेचे आयाेजन केले आहे. पुणे शहर पाेलीस आयुक्तालयातील ११ केंद्रावर टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सह आयुक्त संदिप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात दाेन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे.