प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
By admin | Published: June 2, 2015 05:08 AM2015-06-02T05:08:01+5:302015-06-02T05:08:01+5:30
केंद्र शासनाने लागू केलेल्या प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०११ नुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या
पिंपरी : केंद्र शासनाने लागू केलेल्या प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०११ नुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या उत्पादन व वापरास बंदी घातली आहे. तरीही नियमांचे उल्लंघन करून शहरात दुकानदार, विक्रेते यांच्याकडून सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. महापालिकेच्या वतीने कारवाईचा केवळ फार्स केला जात असून, वांरवार असे प्रकार घडून येत असले, तरी ठोस कारवाईचे पाऊल उचलले जात नाही.
एकदा कारवाई झाली, त्यांनतरही ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन, साठा, विक्री व वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यावसायिकांना पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. दुसऱ्यांदा वापर होत असल्याचे आढळून आल्यास दहा हजारांचा दंड आकारला जाईल. त्यानतंरही असेच कृत्य केल्यास संबंधित व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी कारवाईची तरतूद असल्याचे स्पष्ट करून महापालिकेचे अधिकारी कठोर कारवाईचा केवळ इशारा देतात. एकदा, दोनदा नव्हे, सातत्याने अशा प्रकारे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, साठा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे धाडस मात्र अधिकारी दाखवीत नाहीत. त्यामुळे कारवाईची भीती उरली नाही. (प्रतिनिधी)