रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याच्या तक्रारी सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 08:18 PM2018-04-20T20:18:40+5:302018-04-20T20:18:40+5:30
आरटीओकडे आलेल्या तक्रारींमध्ये भाडे नाकारण्याच्याच तक्रारी अधिक आहेत. रिक्षा स्टँडला रिक्षा उभी असल्यास रिक्षाचालकाने प्रवाशांना ऐच्छिक ठिकाणी घेऊन जाणे अपेक्षित आहे.
पुणे : शहरातील रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. प्रादेशिक परिवहन विभागाकडे रिक्षाचालकांविरोधातील तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारण्याच्याच आहेत. त्याखालोखाल जादा भाडे, उध्दट वर्तन, मीटर फास्टच्या तक्रारींचा समावेश आहे.
रिक्षाचालकांनी भाडे नाकारल्यास त्यांच्याविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रारी करता येतात. तक्रार आल्यानंतर संबंधित रिक्षाचालकाला नोटीस पाठवून त्यावर सुनावणी घेतली जाते. तक्रारीत तथ्य आढळल्यास रिक्षाचालकाला ५०० रुपये दंड किंवा १५ दिवसांसाठी परवाना निलंबित केला जातो. त्यानुसार प्रवाशांकडून आरटीओकडे आलेल्या तक्रारींमध्ये भाडे नाकारण्याच्याच तक्रारी अधिक आहेत. रिक्षा स्टँडला रिक्षा उभी असल्यास रिक्षाचालकाने प्रवाशांना ऐच्छिक ठिकाणी घेऊन जाणे अपेक्षित आहे. पण काही रिक्षा चालक जवळच्या अंतराचे भाडे नाकारण्याचे प्रकार घडतात. केवळ आपल्या सोयीच्या किंवा लांब पल्याचे भाडे घेण्याकडे काही रिक्षाचालकांचा कल असतो. त्यामुळे प्रवाशांना अन्य रिक्षाची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागते.
मागील वर्षभरात रिक्षाचालकांविरोधात भाडे नाकारणे, उध्दट वर्तन, जास्त भाडे घेणे, मीटर फास्ट यांसह अन्य एकुण १८७ तक्रारी आल्या. अनेक प्रवासी तक्रारी करण्याचे टाळतात. त्यामुळे प्रत्यक्षात येणाऱ्या तक्रारी व भाडे नाकारणाºया रिक्षाचालकांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. एकुण तक्रारींमध्येही भाडे नाकारण्याच्या तक्रारी अधिक असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले. आरटीओकडून संबंधित रिक्षाचालकांना वर्ष २०१६-१७ मध्ये ३ लाख ३० हजार रुपयांचा तर वर्ष २०१७-१८ मध्ये १ लाख १९ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
----------------------
वर्ष २०१७-१८ मधील तक्रारी
महिना तक्रारी
एप्रिल १४
मे १३
जून १६
जुलै २७
आॅगस्ट १३
सप्टेंबर १२
आॅक्टोबर १३
नोव्हेंबर १८
डिसेंबर १९
........................................
जानेवारी २०१८ १७
फेब्रुवारी १०
मार्च १५
----------------------