पुणे-लोणावळा लोकलमध्ये सर्वाधिक फुकटे प्रवासी, प्रशासनाची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:42 AM2018-02-18T05:42:01+5:302018-02-18T05:42:10+5:30
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात लोणावळा लोकलमध्ये इतर मार्गांच्या तुलनेत सर्वाधिक फुकटे प्रवासी आढळून आले आहेत. विशेष म्हणजे पुणे ते लोणावळादरम्यान रेल्वेचे केवळ १५ रुपयांचे तिकीट आहे. असे असतानाही अनेक प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास केला जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात लोणावळा लोकलमध्ये इतर मार्गांच्या तुलनेत सर्वाधिक फुकटे प्रवासी आढळून आले आहेत. विशेष म्हणजे पुणे ते लोणावळादरम्यान रेल्वेचे केवळ १५ रुपयांचे तिकीट आहे. असे असतानाही अनेक प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास केला जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
पुणे विभागाकडून पुणे लोणावळा, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज कोल्हापूर या मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबविली जात आहे. या तपासणीमध्ये एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत २ लाख ३४ हजार प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल १३ कोटी १० लाख ३३ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. या प्रवाशांपैकी १ लाख १३ हजार ४०५ प्रवासी विनातिकीट आढळून आले. त्यांना ६ कोटी ३२ लाख ८२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, अतिरिक्त व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाने वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक फुकटे प्रवासी पुणे-लोणावळा मार्गावर आढळून आले आहेत. या लोकलचे तिकीट सर्वात कमी आहे.
पुणे ते आकुर्डीदरम्यान पाच रुपये, पुणे ते देहूरोडदरम्यान १० रुपये, तर पुणे ते लोणावळादरम्यान १५ रुपये तिकीट दर आहे. याशिवाय या स्थानकांदरम्यान मासिक तिकिटासाठी अनुक्रमे १००, १८५ आणि २७० रुपये दर आहे. या तिकिटावर संबंधित प्रवाशांना कितीही वेळा ये-जा करता येऊ शकते. असे असताना विनातिकीट प्रवाशांची संख्या अधिक असल्याने प्रशासनाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
माहिती संकलित करणार
पुणे-लोणावळा मार्गावरील फुकट्या प्रवाशांचे प्रमाण वाढल्याने रेल्वे प्रशासन यावर नियंत्रण मिळविण्यासाठी गांभीर्याने विचार करीत आहे. यापुढील काळात हे प्रमाण कमी न झाल्यास विनातिकीट प्रवाशांची नावे, छायाचित्र, पत्ता, मोबाईल क्रमांक ही माहिती संकलित केली जाईल. त्याआधारे पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.