पाच वर्षांपूर्वी ११ ठिकाणी उभारलेल्या ई-टाॅयलेट्सपैकी बहुसंख्य टाॅयलेट्स बंदच
By राजू हिंगे | Updated: April 15, 2025 19:52 IST2025-04-15T19:48:35+5:302025-04-15T19:52:22+5:30
शहरातील विविध अकरा ठिकाणी अत्याधुनिक ई-टाॅयलेट्स बांधण्यासाठी २०१८ मध्ये करण्यात आली होती

पाच वर्षांपूर्वी ११ ठिकाणी उभारलेल्या ई-टाॅयलेट्सपैकी बहुसंख्य टाॅयलेट्स बंदच
पुणे :पुणे शहराचे तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून दोन कोटी रुपये खर्चून पाच वर्षांपूर्वी ११ ठिकाणी उभारलेल्या ई-टाॅयलेट्सपैकी बहुसंख्य टाॅयलेट्स बंदच आहेत. त्यामुळे या ई-टाॅयलेट्स साध्या टाॅयलेट्समध्ये रूपांतरित करून नागरिकांना साधी, पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्सची सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पालिका आयुक्ताकडे केली आहे.
शहरातील विविध अकरा ठिकाणी अत्याधुनिक ई-टाॅयलेट्स बांधण्यासाठी २०१८ मध्ये करण्यात आली होती. महापालिकेने यासाठी इराम सायंटिफिक सोल्युशन्स या कंपनीला ११ ठिकाणी ही ई-टाॅयलेट्स बांधण्यासाठी व पुढे एक वर्ष मेंटेनन्स करण्यासाठी २ कोटी रुपयांची ऑर्डर दिली. ही टेक्नॉलॉजी या कंपनीने स्वतः विकसित केली असल्याने अन्य कोणी ती देऊ शकत नसल्याने टेंडर न काढता या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. कंत्राटाप्रमाणे कंपनीनेही ई-टाॅयलेट्स बसवून एक वर्ष मेंटेन (२०१९ अखेरपर्यंत) केली. मात्र, त्यानंतर या कंपनीने महापालिकेला टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर केली नाही व पुढे मेंटेनन्स कंत्राट घेण्यातही रस दाखवला नाही आणि ही सर्व ई-टाॅयलेट्स बंद पडली.
रूपाली हाॅटेलसमोर, रामोशी वस्ती, हिरवाई गार्डन, संभाजी उद्यान, माॅडेल काॅलनी, ओम सुपर मार्केट, टिगरे गार्डन, विमाननगर, निलायम पूल, सिंहगड रोड एसटीपी, वाडिया महाविद्यालयाजवळ, तुकाई टेकडी, एल. एम. डी. गार्डन, बावधन शेवटी महापालिकेने नवीन टेंडर काढून दिली होती. सुमारे पाच लाख रुपये खर्ची पडूनही या ११ पैकी तीन टाॅयलेट्स चालू स्थितीत आहेत. त्यामुळे शहरात साध्या, पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्सची प्रचंड कमतरता असताना ती मोठ्या प्रमाणावर बांधायची सोडून असली अत्याधुनिक ई-टाॅयलेट्स बांधण्यावर प्रचंड पैसा खर्च करण्याची कल्पना येते कुठून, असा सवाल सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.