हडपसर-नगर रस्ता-कसब्यात सर्वाधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:26+5:302021-03-13T04:16:26+5:30
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून, शहराच्या सर्वच भागांमध्ये हे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. ...
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून, शहराच्या सर्वच भागांमध्ये हे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णवाढ (१३५२) बुधवारी झाली. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक रुग्ण आहे. त्या खालोखाल नगर रस्ता-वडगाव शेरी, कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांचा क्रमांक लागला आहे. गेल्या काही दिवसात हडपसर परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण नोंदविल्या गेलेल्या भवानी पेठेच्या हद्दीत मात्र सर्वात कमी रुग्ण आहेत.
मागील दोन आठवड्यात झपाट्याने रुग्णवाढ होत चालली आहे. मात्र, ही रुग्णवाढ उपनगरांमध्ये अधिक होत असून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये सर्वात कमी रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे. तर सर्वाधिक वाढ हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये नोंदविण्यात आलेली आहे. उपनगरांमध्ये खबरदारी बाळगण्यात होत असलेली ढिलाई, पोलीस-पालिकेकडून कारवाई करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, व्यापारी आस्थापनांमध्ये धुडकावले जाणारे सुरक्षा नियम यामुळे कोरोना वाढीस हातभार लागत आहे.
---
हडपसर-मुंढवा १८५
नगर रस्ता-वडगावशेरी १३८
कसबा-विश्रामबाग १०१
सिंहगड रस्ता ९८
येरवडा-कळस-धानोरी ९८
बिबवेवाडी ९८
धनकवडी-सहकारनगर ९५
वारजे-कर्वेनगर ९३
औंध-बाणेर ८४
कोथरुड-बावधन ७७
कोंढवा-येवलेवाडी ६४
शिवाजीनगर-घोले रस्ता ६३
ढोले पाटील रस्ता ५६
वानवडी-रामटेकडी ५४
भवानी पेठ ४८
एकूण १३५२