बहुतांश निवासी डॉक्टर कामावर रुजू
By admin | Published: March 22, 2017 03:22 AM2017-03-22T03:22:17+5:302017-03-22T03:22:17+5:30
राज्यातील विविध रुग्णालयांमधील डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ससून रुग्णालयात काम
पुणे : राज्यातील विविध रुग्णालयांमधील डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ससून रुग्णालयात काम करणाऱ्या सुमारे ३०० निवासी डॉक्टरांनी बेमुदत सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. या संपामुळे रुग्णांना वेठीस धरले जात असल्याने उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून निवासी डॉक्टरांना फटकारले.
रात्री ८ पर्यंत कामावर रुजू न झाल्यास पदव्युत्तर अभ्यासक्रम नोंदणी रद्द किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिशीमार्फत ससून प्रशासनातर्फे निवासी डॉक्टरांना देण्यात आला. त्यानंतर बहुतांश निवासी डॉक्टर टप्प्याटप्प्याने कामावर रुजू होत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. संप मागे घेण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
मुंबई, नाशिक, औरंगाबाद, धुळे आदी शहरांमधील डॉक्टरांवर नातेवाइकांकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेची लेखी हमी द्यावी, प्रकरण कोर्टात गेल्यास डॉक्टरांची बाजू
मांडायला वकील नेमावा अशा मागण्या निवासी डॉक्टरांतर्फे करण्यात आल्या. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी कायद्याच्या चौैकटीत राहून संस्थात्मक पातळीवरून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन बैैठकीत दिले. त्याचप्रमाणे, रुग्णांचे हाल होत असल्याने निवासी डॉक्टरांनी आपली जबाबदारी ओळखून वागावे, याबाबत समुपदेशन केले. तत्पूर्वी, निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनीही निवासी डॉक्टरांची भेट घेऊन संवाद साधला.
डॉ. चंदनवाले म्हणाले, ‘‘निवासी डॉक्टरांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यांच्या मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे संपातून माघार न घेणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. निवासी डॉक्टर टप्प्याटप्प्याने कामावर रुजू होत आहेत.’’
दरम्यान, ससून रुग्णालयातील ३९५ डॉक्टरांपैकी २५० निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले होते. १४५ निवासी डॉक्टर कामावर असून, केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया रुग्णालयाकडून करण्यात आल्या. रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात आल्या. (प्रतिनिधी)