"सत्ताधाऱ्यांच्याच काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:20 AM2019-03-06T01:20:30+5:302019-03-06T01:20:51+5:30
केंद्रातील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? शिवरायांचे नाव घेवून सन २०१४ मध्ये विजयी झालात.
नारायणगाव : केंद्रातील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? शिवरायांचे नाव घेवून सन २०१४ मध्ये विजयी झालात. ज्या रयतेने कल्याणकारी राज्य म्हणून निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत रायगडवर नव्हे तर कुठल्याही किल्ल्यावर ते फिरकले नाहीत. त्यांना महाराजांचा विसर पडला. नोटाबंदीद्वारे काळा पैसा आणून त्या पैशातून दहशतवाद्यांविरोधत कारवाई करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, याच सरकारच्या काळात दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची जन्मभूमी असलेल्या नारायणगाव येथे स्वागत मेळाव्याचे आयोजन जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, युवा नेते अतुल बेनके, प्रदीप गारटकर, जालिंदर कामठे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, अशोक घोलप, बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे, निवृत्ती काळे, देवदत्त निकम, राजश्री बोरकर उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले, पुलवामा हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. मात्र, एका वृत्तपत्रामध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या सरकारच्या काळात ४५० जवान शहीद झालेले असताना ५६ इंचांची छाती दिसते कशी? शिवनेरीचा शिलेदार म्हणून १५ वर्षे काम करणारे प्रतिनिधी व मंत्री यांना या परिसराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊ शकले नाहीत.
अजित पवार म्हणाले की, पुरंदरला विमानतळ नेण्याचे पाप कुणाचे आहे. बाह्यवळणाची कामे का बंद पडली आहेत. खेड ते सिन्नर या रस्त्याचे १३८ कि.मी.पैकी १०९ कि.मी.चे काम झाले आहे. २९ कि.मी.चे काम अपुरे राहिले यास जबाबदार कोण आहे? रेल्वे येणार हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सांगतात. आता तर हायस्पीड रेल्वे येणार, अशी घोषणा करणाऱ्यांनी पहिली रेल्वे तर सुरू करून दाखवावी. यावेळी दिलीप वळसेपाटील, विलास लांडे, अतुल बेनके, माजी आमदार दिलीप ढमढेरे, सत्यशील शेरकर यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. हिरापंकज पिंपळगावकर यांनी केले.
>सिनेअभिनेते, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर होईल, असे कार्यकर्त्यांना वाटत असल्याने मंगळवारी नारायणगाव येथे झालेल्या सभेला मोठी गर्दी झाली होती. परंतु, अजित पवार यांनी उमेदवारीबाबत बगल देत जुन्नरकरांच्या मनातील उमेदवार देण्यात येईल, असे भाषणात दोन-तीन वेळा उल्लेख केल्याने डॉ. कोल्हे यांनाच उमेदवारी मिळेल, असे वाटत असताना डॉ. कोल्हे यांना स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण राज्यात त्यांच्यावर जबाबदारी टाकणार असल्याचे सांगितल्याने नेमकी लोकसभेची उमेदवारी कोणाला याबाबत उलट सुलट चर्चा सभा सुटल्यानंतर सुरू होती. डॉ. कोल्हे यांना उमेदवारी जाहीर होणार, असे समजून आलेले त्यांचे चाहते उमेदवारी जाहीर न झाल्याने नाराजी व्यक्त करत निघून गेले.