गेल्या १० वर्षातील सर्वात उशिरा मॉन्सून पुण्यात दाखल...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 01:31 PM2019-06-24T13:31:46+5:302019-06-24T13:44:09+5:30
पुणे शहरात सोमवारी सकाळी काही वेळ अधून मधून पावसाच्या सरी आल्या़...
पुणे : पुणे शहरासह अलीबाग, माळेगाव, खंडावा, धिंडवाडा या परिसरात मॉन्सूनने सोमवारी आगमन केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले़. पुण्यात मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर केले असले तरी पाऊस मात्र दिसून येत नाही.
रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते़ ढगांनी आकाशात गर्दी केली होती़. मात्र, पाऊस काही झाला नाही़. पुणे शहरात सोमवारी सकाळी काही वेळ अधून मधून पावसाच्या सरी आल्या़. सकाळी पावसाळी वातावरण दिसून येत होते़. मात्र, काही वेळात आकाशात जमलेल्या ढंगाची पांगापाग झाली़. पाठोपाठ आकाश निरभ्र होऊन मोठा पाऊस येण्याची आशा दूर गेली़. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुण्यात १.४ मिमी पावसाची नोंद झाली होती़.
जून महिन्यात पुण्यात सरासरी १०३ मिमी पाऊस पडतो़. परंतु, आतापर्यंत केवळ ४२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पुढील चार दिवसात जोरदार पाऊस येण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी या पावसाळ्यात अजून पाणी साठ्यात वाढ होऊ शकेल इतका मोठा पाऊस झालेला नाही.
पुढील चार दिवस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी वगळता राज्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही. सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़.
यापूर्वी पुणे शहरात मॉन्सून दाखल
२०१९ २४ जून
२०१८ ९ जून
२०१७ १२ जून
२०१६ २० जून
२०१५ १२ जून
२०१४ १९ जून
२०१३ ८ जून
२०१२ १७ जून
२०११ ४ जून