पुणे शहरातील कोरोनाबाधित मृत्यूपैकी सर्वाधिक ससून रुग्णालयामध्येच ; त्यामागचं ' हे 'आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 04:19 PM2020-04-09T16:19:44+5:302020-04-09T16:25:14+5:30
ससून रुग्णालयाविषयी सर्वसामान्य नागरिक तसेच कोरोना बाधित व त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्येही भीती निर्माण होऊ लागली आहे.
पुणे : शहरातील कोरोनाबाधित मृत्यूपैकी ससून रुग्णालयामध्येच सर्वाधिक मृत्यू होत आहेत. त्यामुळे ससूनविषयी लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ लागली आहे. पण ससूनमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण खासगी रुग्णालयातून तर काही रुग्ण बाह्यरुग्ण विभागात आलेले आहेत. त्यांची प्रकृती आधीच खुप खालावलेली होती. तसेच बहुतेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच अन्य आजार होते. त्यामुळे ससूनमधील मृतांचा आकडा अधिक दिसत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरूवारी दुपारपर्यंत मृत्यूची संख्या २० वर पोहचली असून त्यापैकी ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्यांची संख्या १० हून अधिक आहे. तर उर्वरित रुग्णांचा नायडू किंवा अन्य खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाविषयी सर्वसामान्य नागरिक तसेच कोरोना बाधित व त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्येही भीती निर्माण होऊ लागली आहे. ससूनमध्ये सध्या सुमारे २५ रुग्ण दाखल असून त्यापैकी जवळपास १० रुग्ण गंभीर आहेत. दररोज रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
यापार्श्वभुमीवर बोलताना डॉ. चंदनवाले म्हणाले, ससूनमध्ये मृत्यू झालेल्या बहुतेक रुग्णांचे वय ६० च्या पुढे आहे. तसेच बहुतेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग तसेच अन्य जुनाट आजारही होते. या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयांकडून गंभीर अवस्थेत ससूनकडे पाठविले जात आहेत. तसेच काही रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. त्यावेळी काहींची प्रकृती खालावलेली असते.
ससूनमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर तातडीने आवश्यकतेनुसार उपचार केले जातात. रुग्णांची लक्षणे पाहून तसेच आधीच्या आजाराप्रमाणे औषधे दिली जात आहेत. त्यात बदलही केले जात आहेत. गंभीर रुग्णांमध्ये अन्य आजार असो वा नसो त्यांचे हृदय, फुफ्फुस, मुत्रपिंड, यकृत आदी अवयवांची तपासणीही केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा इतर अवयवांवर काय परिणाम होत आहे हेही तपासले जात आहे. ससूनमध्ये योग्यप्रकारे काळजी घेतली जात असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. मृतांमध्ये वयोवृध्द व आधी आजार असलेल्या नागरिकांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे या लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी स्पष्ट केले.
----------------
पालिका आरोग्य अधिकाऱ्यांचाही दुजोरा
ससूनमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्युचे प्रमाण जास्त असले तरी त्यास ससून जबाबदार नसल्याचे महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. ससूनमध्ये दाखल होणारे रुग्ण गंभीर स्थितीतील असतात. खासगी रुग्णालये हे रुग्ण त्यांच्याकडे पाठवितात. त्यामुळे तेथील मृतांचा आकडा जास्त आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------
--