मैत्रिणीला फिरविणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:53 AM2019-03-02T02:53:18+5:302019-03-02T02:53:24+5:30
युनायटेड नेशन्स हायकमिशनर फॉर रिफ्यूजी स्टेटच्या पत्रावर (व्हिसा) तो गेल्या बारा वर्षांपासून भारतात राहत असल्याचे समोर आले आहे.
पुणे : मैत्रिणीला वेगवेगळ््या दुचाकीवरून फिरविण्याचा मोह इराकी युवकाला चांगलाच महागात पडला. तिला फिरविण्याकरिता दुचाकी चोरणाऱ्या इराकी युवकाला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पकडले. त्याच्यासह आणखी एका इराकी साथीदाराने शहरातील विविध भागांतून चोरलेल्या दोन लाखांच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
अक्रम अल्बदेअरी फैज अल्बदेअरी (वय २०, रा. कोेंढवा, मूळ इराक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. युनायटेड नेशन्स हायकमिशनर फॉर रिफ्यूजी स्टेटच्या पत्रावर (व्हिसा) तो गेल्या बारा वर्षांपासून भारतात राहत असल्याचे समोर आले आहे. कोंढवा परिसरात एक परदेशी तरुण चोरी केलेल्या पल्सर दुचाकीवर फिरत आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट ४ मधील सहायक फौजदार अब्दुल करीम सय्यद आणि पोलीस हवालदार गणेश साळुंखे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २७ फेब्रुवारीला सापळा रचला, तसेच संशयित तरुण अक्रम यास त्याच्या मैत्रिणीसोबत चोरीच्या दुचाकीवर फिरताना ताब्यात घेतले.
अक्रम याच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये त्याचा साथीदार औस अलहेंदी (वय ३३, रा. कोंढवा, मूळ इराक) याच्या मदतीने शहरात दुचाकींची चोरी केली. औस आणि अक्रम हे पुणे शहरात येणाऱ्या अरब देश आणि आफ्रिकन देशातील नागरिकास कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणे, रूम आणि दुचाकी भाड्याने देण्याचे व्यवहार करीत असत. त्यासाठी चतु:शृंगी आणि कोंढवा परिसरातून चार दुचाकी चोरल्या होत्या. नागरिकांकडून पैसे घेत व्यवहार अर्ध्यावर सोडून औस हा त्याला सोडून निघून गेला. त्यानंतर अक्रम हा काही काळासाठी औरंगाबाद येथे त्याच्या आईकडे गेला. तेथेही त्याने एक दुचाकी चोरली आणि ती पुणे शहरात घेऊन आला आणि त्यावर मैत्रिणीला घेऊन फिरत होता. अक्रमकडून २ लाख ९ हजारांच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. सहायक निरीक्षक गणेश पवार, अश्विनी जगताप, कर्मचारी भालचंद्र बोरकर, सचिन ढवळे, रमेश साबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.