नियतीने केली मायलेकरांची तटातुट, माणुसकीने घडवली गळाभेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:59 PM2022-02-01T18:59:25+5:302022-02-01T19:03:16+5:30
पश्चिम बंगालच्या मनोरूग्ण मातेला मुलाकडे सुपुर्त करण्यात पुण्याच्या हेल्पिंग हॅन्ड सोशल फाऊंडेशनला यश
पांडुरंग मरगजे
धनकवडी : नियतीची खेळ अत्यंत क्रुर असतो; घटक्यात तो मायलेकरांची सुद्धा ताटातूट करू शकतो. परंतु नियती किती ही बलवान असली तरी माणुसकी ही क्रूर नियतीपेक्षा कधीही श्रेष्ठच असते, याची प्रचिती हेल्पिंग हॅन्ड सोशल फाऊंडेशनच्या कार्यामुळे आली. पश्चिम बंगालमधून बेपत्ता झालेली एक मनोरुग्ण माता बोपदेव घाट परिसरात आढळून आली. संस्थेच्या संचालिका स्वाती डिंबळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही माता पुन्हा आपल्या मुलाला भेटली. माय लेकरांच्या या गळा भेटीने साऱ्यांचेच डोळे पाणावले.
हेल्पिंग हॅन्ड सोशल फाऊंडेशन च्या संचालिका स्वाती डिंबळे यांना एक मनोरुग्ण महिला बोपदेव घाट ते भिवरी दरम्यान फिरताना आढळली. या मनो रूग्ण महिलेचा सांभाळ स्वाती डिंबळे यांनी आपल्या आसरा या संस्थेत केला. दहा महिन्यांच्या कालावधीत तिच्यावर मानसोप चार तज्ज्ञांकडून उपचार करून त्यांनी तिला बोलतं केलं. तिच्या मोडक्या तोडक्या हिंदी संवादातून काही ठिकाणांची माहिती मिळाली. त्यावरून माग काढणाऱ्या स्वाती डिंबळे यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले.
आईचा शोध घेत पश्चिम बंगाल हून पुण्यात आलेल्या राकेश मंडलची आई रेखा मंडलसोबत गळाभेट झाली. माय लेकरू आनंदाश्रूंमध्ये अक्षरश: भिजून चिंब झाले. मुलाला पाहून आनंदित झालेली ही माता मुला सोबत घरी अर्थात पश्चिम बंगाल मधील मालदा या आपल्या मुळ गावी जायला तयार झाली.
पतीच्या निधनानंतर अत्यंत हालाखित चार मुलांचा सांभाळ करणाऱ्या रेखा मंडलचा एक लहान मुलगा अचानक घरातून निघून गेला. लागोपाठ घडलेल्या या दुर्दैवी घटनांचा धक्का रेखा मंडल यांना सहन झाला नाही. रेखा मानसिक रूग्ण झाली. ती पंधराशे किलोमीटर अंतरावरील पुण्यात कशी आली, याचा उलगडा करणं अशक्य असलं तरी तिला पुन्हा कुटुंबियांकडे सुपुर्त करण्याचे अवघड काम स्वाती डिंबळे यांनी मातेच्या ममतेने पार पाडले.
मनोरूग्ण महिलेला आश्रमात आणणे, तिची महिनोमहिने सुश्रुषा करणे, अनेक उपचार करून तिला बोलतं करणे, पश्चिम बंगालच्या पोलिसांशी सतत संपर्क साधणे, पश्चिम बंगालच्या पोलीसांची टाळाटाळ सहन करणे अशी अनेक दिव्ये स्वाती डिंबळे यांनी पार पाडली. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. पंधराशे किलो मीटरवरून पुणे बोपदेव घाट - भिवरी परिसरात भटकणार्या मातेला तिच्या मुलाकडे सुपुर्त करण्यात स्वाती डिबळे यशस्वी झाल्या.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन च्या पोलिस निरिक्षक (गुन्हे) संगीता यादव यांच्या हस्ते रेखा व राकेश मंडलचा सत्कार करण्यात आला. 'नियतीने घातला घाला परी माणुसकीला फुटला पान्हा' ही नवीन म्हण यानिमित्ताने मराठीत रुढ झाल्या चा अनुभव उपस्थितांना आला.
निराधार व मनोरूग्णां ना सांभाळण्याचे अत्यंत कठीण काम स्वाती डिंबळे करत आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबीयां पर्यंत पोचवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.ही खरोखरच एक अलौकिक मानव सेवा आहे.
-संगीता यादव, पोलिस निरिक्षक (गुन्हे) शाखा, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन