Mothers Day: लाखो वन्यजीवांना पुन्हा जगण्याची संधी देणारी ‘आई’ ! १५ वर्षांपासून करतायेत प्राण्यांवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 02:39 PM2024-05-12T14:39:48+5:302024-05-12T14:40:31+5:30
रस्त्यावर अनेकदा जखमी, अनाथ प्राणी दिसायचे, तेव्हा मला वेदना व्हायची
श्रीकिशन काळे
पुणे: एखाद्या लहान बाळाला काही हवं असेल तर ते त्याच्या आईला लगेच कळतं. बिचाऱ्या मुक्या प्राणी, पक्ष्यांना काही खुपलं, लागलं, खरचटलं तर त्यांच्या भावना कोण समजून घेणार! पण त्यांच्याही भावना समजून घेऊन त्यांची शुश्रूषा करणारी नव्या विचारांची एक आई पुण्यात आहे. तिचे नाव नेहा पंचमिया. ती गेल्या कित्येक वर्षांपासून जखमी झालेल्या प्राण्यांवर उपचार करतेय आणि त्यांना जगण्याची पुन्हा संधी देतेय. जखमी झालेल्या सर्व प्राण्यांची ती आईच बनली आहे.
दरवर्षी मातृदिन साजरा करण्यात येतो. त्यामध्ये माणसांच्या गोष्टी साजऱ्या होतात. पण एक वेगळी हटके आईदेखील आहे. त्या आईविषयी आपण जाणून घेणार आहोत. कारण एखाद्या बाळाची काळजी जशी आई घेते, अगदी तशीच काळजी नेहा पंचमिया यादेखील जखमी प्राण्यांची घेत आहेत. त्यांनी ‘रेस्क्यू’ नावाची संस्था सुरू केली असून, त्याअंतर्गत जखमी प्राण्यांवर उपचार केले जात आहेत.
आजपर्यंत बिबट्यापासून हत्तीपर्यंत आणि छोट्या नवजात खारूताईच्या पिल्लांपासून ते गाय-म्हशीच्या वासरांपर्यंत सर्व प्राण्यांवर त्यांच्याकडून शुश्रूषा केली जाते. त्यांच्या बावधन येथील रेस्क्यू संस्थेत जखमी प्राणी आणला जातो आणि तिथे त्यावर वैद्यकीय अधिकारी उपचार करतात. नेहा यांनी सुरुवातीला काम सुरू केले, तेव्हा त्यांना कसलाही अनुभव नव्हता; पण हळूहळू काम करताना अनुभव आला आणि त्यांनी मग शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार सुरू केले. त्यांच्याकडे आज ५० पेक्षा अधिक स्वयंसेवक आणि वैद्यकीय डॉक्टरांची टीम आहे. त्या स्वत: कुठलाही लहानसा प्राणी असला तरी त्याची देखरेख स्वत: पाहतात. त्याची काळजी घेतात. त्यामुळेच त्या आता वन विभागासोबतदेखील काम करत आहेत. राज्यामध्ये कुठेही वन्यप्राणी जखमी झाला, तर बावधनमध्ये त्यांच्याकडे आणला जातो. त्यावर उपचार करून निसर्गात सोडून दिले जाते.
रस्त्यावर अनेकदा जखमी, अनाथ प्राणी दिसायचे. तेव्हा मला वेदना व्हायची. त्यामुळे मी त्या प्राण्यांना मदत करायचे. ते पुरेसे नव्हते, त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी काम करण्याचे ठरवले. आज त्याला १५ वर्षे होऊन गेले. हजारो, लाखो प्राण्यांवर उपचार केले आहेत आणि त्यांना जगण्याची संधी दिली आहे. - नेहा पंचमिया, संस्थापक, रेस्क्यू