माता, बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात मातृवंदना सप्ताह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 02:24 PM2019-12-02T14:24:38+5:302019-12-02T14:25:13+5:30
माता, अन् बालमृत्यू हे आरोग्यविभागापुढे आव्हान
पुणे : माता, बालमृत्यू रोखण्यासाठी आणि या संदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना अमलात आणण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हे प्रमाण रोखण्यासाठी व्यापक प्रमाणावर पावले उचलली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून येत्या रविवारपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जिल्ह्या परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
माता, अन् बालमृत्यू हे आरोग्य विभागापुढे आव्हान आहे. यामुळे हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रथमच ज्या मातांची प्रसूती झाली किंवा गर्भधारणा झाली असेल त्यांना शासनाकडून या योजनेंतर्गत मदत केली जाते. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलेस एकूण तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचा लाभ मिळतो. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसाच्या आत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता एक हजार रुपये तसेच किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास, गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता २ हजार रुपये, प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटॅटीस बी किंवा त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला डोस दिल्यानंतर तिसरा हप्त्याची २ हजार रुपये रक्कम शासनातर्फे दिली जाते. यासाठी महिलांनी या योजनेअंतर्गत नोंदणीकरणे गरजेचे आहे.
बाळ हे गर्भात असतांनाचा त्याचे कुपोषण सुरू होते. याचा परिणाम बालकाच्या जन्मानंतर दिसतो. ग्रामीण भागात अनेक कुटुंबियांची आर्थिक स्थिती कमकुवत असते. यामुळे त्यांना खर्च परवडत नाही. बाळंतपणाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत महिलांची कामे सुरूच असतात. या सर्वांचा मातेच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच दुधावरही परिणाम होत असल्याने मुलाला पुरेशा प्रमाणात दूध मिळत नाही. या सर्वांमुळे केंद्र शासनाने जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली. या योजनेची सुरूवात डिसेंबर महिन्यापासून राज्यात करण्यात आली आहे.
.............
सर्व आरोग्य केंद्रात माहितीपत्रकांचे वाटप...
महिला आणि बालकाच्या आरोग्यासाठी या सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभात फेरीचे आयोजन करणे, पात्र लाभार्थ्यांकडील अर्जाची नोंदणी घरोघरी जाऊन करणे, लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, ग्रामसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बैठका घेणे असे विविध उपक्रम जिल्ह्यात राबविले जाणार आहेत. मातृवंदना सप्ताहनिमित्त सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व सेवा क्षेत्रांमध्ये माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा लाभ पात्र लाभार्थी महिलांनी घ्यावा.- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी