डोक्यावर गांजाची पोती घेऊन जाणाऱ्या सासू-सुनांना अटक; तब्बल ४ लाखांचा २० किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:16 PM2022-12-05T15:16:51+5:302022-12-05T15:17:01+5:30
विक्रीसाठी बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी या दोन्ही सासा सुनाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गांजाची नशा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वाढत्या कारवाईवरून तरी तसेच दिसत आहे. सहज होणारी उपलब्धता आणि कमी किंमत यामुळे झोपडपट्टीपासून ते उच्चभ्रू भागापर्यंत सर्वांनाच या गांजाचा चस्का लागला आहे. दरम्यान वाढत जाणारी गांजाची मागणी पाहता पुणे पोलिसांचेअमली पदार्थ विरोधी पथकही चांगलीच सक्रिय झाले आहे. या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गांजा विक्री करणाऱ्या सासु-सुनांना अटक केली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना दोन महिला आपल्या डोक्यावर नायलॉनच्या पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांचे सुतळीने बांधलेल्या पिशव्या घेऊन जाताना दिसल्या. या महिलांच्या संशयास्पद हालचाली पाहता पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी दोघींनाही बाजूला घेऊन विचारपूस केली असता दोघी सासु-सुना असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या पिशव्यांची तपासणी केली असता तर पोलिसांना धक्काच बसला. या दोन्ही पिशव्यांमध्ये त्यांना गांजा आढळून आला.
सासूच्या डोक्यावर असणाऱ्या गांजाच्या पिशवीत 10 किलो 245 ग्राम गांजा सापडला. तर सुनेच्या डोक्यावर असणाऱ्या पिशवीत 10 किलो 365 ग्रॅम गांजा सापडला. एकूण 20 किलो असणाऱ्या या गांजाची किंमत चार लाख 12 हजार रुपये इतकी होती. विक्रीसाठी बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी या दोन्ही सासा सुनाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहे.