Pune Crime : सुनेकडून सासूला गजाने मारहाण; पुण्यातील जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 11:30 AM2022-10-13T11:30:50+5:302022-10-13T11:32:39+5:30
माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल...
सांगवी (पुणे) : सासू-सुनेचा वारंवार होणारा वाद व आपला लहान मुलगा आजीकडे सतत जात असल्याचा राग मनात धरून सासूला सुनेने गजाने मारहाण केल्याचा प्रकार शिरवली (ता. बारामती) येथे घडला आहे. याबाबतची फिर्याद ताराबाई दत्तात्रय पोंदकुले (वय ६०, रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दिली असून, सून रेखा दीपक पोंदकुले (रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे) हिच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सोमवारी चार वाजण्याच्या दरम्यान सासू ताराबाई पोंदकुले या घरासमोर भांडी घासत होत्या. यावेळी फिर्यादीचे अपंग दीर बाळासो उत्तम पोंदकुले हे त्यांच्या घरासमोर बसले होते. या दरम्यान, सून रेखा दीपक पोंदकुले हिने फिर्यादी सासूकडे आपला लहान मुलगा स्वराज आला आहे का, अशी विचारणा केली. यावेळी फिर्यादीने माझ्याकडे स्वराज आला नसल्याचे सांगितले. यावर सून रेखा हिने माझा मुलगा तुझ्याकडे सारखा का येतो, असे म्हणून साडीच्या पदरात लपून आणलेला लोखंडी गज बाहेर काढत फिर्यादीच्या डोक्यात मारला.
यावेळी सासूने गज धरून हाताने जोरात धक्का मारत स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार आर. यु. धिवार करीत आहेत.