धावत्या रेल्वेत मावस भावानेच केला अत्याचार; अभियंता तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी
By नम्रता फडणीस | Published: August 27, 2022 07:23 PM2022-08-27T19:23:53+5:302022-08-27T19:24:09+5:30
हरिद्वार ते पुणे धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये हा भयंकर गुन्हा घडला...
पुणे : धावत्या रेल्वेत बहिणीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मावस भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आठ वर्षांपूर्वी हरिद्वार ते पुणे धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये हा भयंकर गुन्हा घडला. यात नराधमाला शिक्षा झाली आहे.
सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी हा निकाल दिला. यात ३२ वर्षीय आरोपी 'मर्चंट नेव्ही मधील इंजिनीअर असून, त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) (एफ) नुसार बलात्कार आणि कलम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरविले. याबाबत पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार १४ जुलै २०१५ रोजी संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात पीडितेच्या मावशीच्या घरी घडला.
घटनेच्या दिवशी पीडित मुलगी, तिची मावशी आणि मावस भाऊ रेल्वेने पुण्यात येत होते. भोपाळ रेल्वे स्थानक येण्यापूर्वी पीडित मुलगी रेल्वेतील स्वच्छतागृहात गेली. तेथून बाहेर येत असताना आरोपीने तिला पुन्हा स्वच्छतागृहात ढकलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या पीडितेने पुण्यात आल्यावर घडलेला प्रकार तिच्या मावशीला आणि मैत्रिणीला सांगितला. दुसऱ्या दिवशी पीडितेच्या मैत्रिणी तिच्या मावशीच्या घरी आल्या. त्यावेळी पीडिता त्यांना रेल्वेत घडलेली घटना सांगत असताना मावस भाऊ तेथे आला. त्याने पीडितेला जमिनीवर ढकलून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मावशीने आणि पीडितेच्या मैत्रिणीने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना मारहाण केली आणि घरातून पोबारा केला. या प्रकरणात आरोपीवर भोसरी एमआयडीसी आणि भोपाळ रेल्वे पोलीस ठाण्यात बलात्कार, खुनाचा प्रयत्न, धमकावणे यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि सहायक पोलीस फौजदार नारायण पवार यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.
मावशी आणि मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची मावशी आणि मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने मावस बहिणीवर बलात्कार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून, त्याला अधिकाधिक कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद सप्रे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.