पाय लागल्यावरून झालेल्या भांडणात सासूने सुनेला जिवानिशी मारले; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 06:08 PM2023-03-08T18:08:47+5:302023-03-08T18:10:02+5:30
शवविच्छेदनात डॉक्टरांनी डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यु झाल्याचा अहवाल...
पुणे : पाय लागल्याने सूनेने सासूला शिवीगाळ केली. त्या रागातून तिला मारहाण करुन फरशीवर पडलेल्या सूनेचे सासूने केस धरुन डोके जमिनीवर आपटून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सासूला अटक केली आहे. कमला प्रभुलाल माळवी (वय ४९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे सासूचे नाव आहे. रितु रवींद्र मालवी (वय २८) असे मृत्यु पावलेल्या सुनेचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समु रामकिशोर चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना लोहगावमधील कलवड वस्तीत ६ मार्च रोजी पहाटे ३ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र आणि रितु यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या लग्नाला सासू कमला माळवी हिचा विरोध होता. रितू, रवींद्र यांना एक मुलगाही आहे. लग्नाला १० वर्ष झाल्यानंतरही कमला यांचा विरोध कमी झाला नाही. त्यावरुन त्या नेहमी सुनेशी भांडणे करीत असत. घरकाम, स्वयंपाक व नातवाला व्यवस्थित सांभाळत नाही, म्हणून त्या कायम सुनेला बोलत असत. ६ मार्च रोजी पहाटे चहा करण्यासाठी सासू बेडरुममध्ये ठेवलेल्या फ्रिज उघडत असताना त्यांचा पाय सुनेला लागला. त्यावरुन सुनेने त्यांना शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने सासुनेही तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यात रितु खाली फरशीवर पडल्या. तेव्हा सासुने तिचे केस धरुन डोके जमिनीवर आपटले. त्यात रितु हिचा मृत्यु झाला. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनात डॉक्टरांनी डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यु झाल्याचा अहवाल दिला.
झोपेत असताना सुन कॉटवरुन पडल्याने तिच्या डोक्याला लागून तिचा मृत्यु झाल्याचे सासु सांगत होती. ते सांगताना त्या गडबडल्याने पोलिसांना संशय आला. त्यांच्याविषयी माहिती घेतल्यावर दोघींची नेहमी भांडणे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सासुकडे वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीमध्ये त्यांचा धीर संपला अन त्यांनी आपणच फरशीवर सुनेचे डोके आपटल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.