आई मैदानात अन् बाळ पोलिसांच्या कुशीत; भरतीसाठी आलेल्या महिलेचे बाळ सांभाळले पोलिसांनी
By नारायण बडगुजर | Published: July 6, 2024 09:13 PM2024-07-06T21:13:50+5:302024-07-06T21:14:07+5:30
पोलिस भरतीसाठी आलेल्या एका महिला उमेदवाराचे बाळ रडत होते.
पिंपरी : पोलिस भरतीसाठी आलेल्या एका महिला उमेदवाराचे बाळ रडत होते. त्यामुळे पिंपरी - चिंचवड पोलिस दलातील एका महिला अंमलदाराने त्याला सांभाळले. आपले बाळ पोलिसांच्या कुशीत विसावल्याने संबंधित महिला उमेदवाराला मैदानी चाचणीवर लक्ष केंद्रित करता आले. या मदतीबाबत मैदानी चाचणीसाठी आलेल्या महिलेने पोलिसांचे आभार मानले.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलात २६२ पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे ही भरती १९ जून ते १० जुलै या कालावधीत होत आहे. २६२ जागांसाठी तब्बल १५ हजार ४२ अर्ज आले. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा असल्याने २५ ते ३० जून या कालावधीत भरती प्रक्रिया स्थगित केली होती. १ जुलै पासून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
दरम्यान, शनिवारी (दि. ६) पहाटे एक महिला उमेदवार भरतीसाठी आली. तिच्यासोबत तिचे तान्हे बाळ होते. तान्ह्या बाळाला मैदानाच्या बाजूला ठेवून ती महिला शारीरिक चाचणीसाठी मैदानात होती. अचानक बाळ रडू लागले. बराच उशीर झाला तरी बाळ रडत होते. हा प्रकार मैदानात असलेल्या महिला पोलिस अंमलदाराने पाहिला. पोलिस महिलेने बाळाला घेऊन कुशीत घेतले. त्यानंतर बाळ शांत झाले. बाळ शांत झाल्याने उमेदवार महिलेने पोलिस भरतीवर लक्ष केंद्रित केले. पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे उमेदवार महिलेने पोलिसांचे आभार मानले.
सहा हजार पुरुष उमेदवारांची चाचणी पूर्ण
पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीसाठी १९ जून ते ५ जुलै दरम्यान ११५५३ पुरुष उमेदवारांना बाेलावण्यात आले होते. त्यापैकी ६८०१ उमेदवार हजर राहिले. त्यातील ५९५८ उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली.
पहिल्याच दिवशी ७२९ महिलांची चाचणी
पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत ६ जुलै रोजीपासून महिला उमेदवारांच्या मैदानी चाचणीला सुरुवात झाी. यात पहिल्याच दिवशी १२०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. त्यात ८६४ महिला हजर राहिल्या. त्यातील ७२९ महिला उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली.