जन्मदात्या आईने केला दोन मुलांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 08:44 PM2018-03-04T20:44:15+5:302018-03-04T20:44:15+5:30
मुले नको असल्याने केले कृत्य : जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर येथील घटना नारायणगाव : जन्मदात्या आईनेच तिच्या दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून जिवे मारल्याची मातृत्वाला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर (शिरोली) येथील हा प्रकार उघडकीस आली.
मुले नको असल्याने केले कृत्य : जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर येथील घटना
नारायणगाव : जन्मदात्या आईनेच तिच्या दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून जिवे मारल्याची मातृत्वाला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर (शिरोली) येथील हा प्रकार उघडकीस आली. नारायणगाव पोलिसांनी अवघ्या ७ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. चांगुणा (सविता) दशरथ आतकरी (वय २८, आतकरी मळा, सुलतानपूर, ता.जुन्नर) असे आईचे नाव आहे. तर आरू दशरथ आतकरी (वय ६), साहिल दशरथ आतकरी (वय ४.५) अशी मृत मुलांची नावे आहेत. याप्रकरणी मुलांचे वडील दशरथ आतकरी यांनी मुलांच्या आईविरुद्ध मंगळवारी दि. २७ रोजी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगुणा व दशरथ आतकरी यांना ३ मुली व १ मुलगा असा परिवार आहे. या चार जणांचा सांभाळ चांगुणाला करावा लागत होता. मुलाच्या हव्यासापोटी तीन मुली व एक मुलगा सांभाळणे तिला नको वाटायचे. तिला पहिली मुलगी झाली तेव्हा ही एकच मुलगी असावी असे तिला वाटत होते. परंतु , मुलाच्या हव्यासापोटी चार लेकरे सांभाळणे तिला नको झाले होते. रोज शेतातील कामे, गुरे पाहणे ही रोजची कामे करावी लागत होती. या संसाराला चांगुणा वैतागली होती. त्यामुळे तिने या पूर्वीही मुलांना मारण्यासाठी विहिरीवर घेऊन गेली होती. मात्र, शेवटच्या क्षणी तिने निर्णय बदलला होता. दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी चांगुणा व दशरथमध्ये शर्टावरून किरकोळ वाद झाला होता. त्या वेळी तिने तुझ्या वंशाला दिवा ठेवणार नाही अशी धमकी दिली. घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरू व साहिलला घेऊन ती शेतात गवत कापण्यासाठी गेली. त्यानंतर शेताजवळील संपत जगदाळे यांच्या विहिरीत मुलाला ढकलून दिले. हा प्रकार मुलीने पाहिल्याने भीतीपोटी तिने मुलीलाही विहिरीत ढकलून दिले. दोन मुले दिसत नसल्याने दशरथने पोलिसांत तक्रार दिली.
सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक दीपक साबळे, आबा चांदगुडे, शंकर भवारी, रामचंद्र शिंदे , दिनेश साबळे यांनी सखोल तपास सुरू केला. संशयाची सूई चांगुणावर असल्याने त्यांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली. यानंतर तिने दोन्ही मुलांच्या खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दि. ३ रोजी चांगुणाला अटक करून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. जुन्नर न्यायालयात तिला हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याने तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.