'आई' म्हणजे भारीच! तंबाखू व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीला दुचाकीवरील ‘आई’ नावावरून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 12:19 PM2023-07-23T12:19:14+5:302023-07-23T12:19:24+5:30
घटनास्थळावरून दुचाकीस्वाराचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले, त्यावर आई असे लिहिले होते, या धाग्यावरून पर्वती पोलिस आरोपीपर्यंत पोहचले
सहकारनगर: गुन्हेगार गुन्हा करताना काही ना काही धागे सोडून जात असतो. त्यावरून पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचतात. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पिस्तुलातून गोळीबार करून तंबाखू व्यापाऱ्याला चार लाख रुपयांना लुटले होते. गणेश कला क्रीडा मंचाजवळ चार दिवसांपूर्वी ही घटना घडली हाेती. या घटनेत पोलिसांना काहीही सुगावा लागला नव्हता. मात्र, या अगोदर या तंबाखू व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाल्याचे समजले. त्यावेळच्या घटनास्थळावरून दुचाकीस्वाराचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यावर ‘आई’ असे लिहिले होते. या धाग्यावरून पर्वती पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.
सूरज वाघमोडे (वय २१, रा. बावधन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार पळून गेले आहेत. सूरज हा मार्केट यार्ड येथे हमालीकाम करतो. त्याची माहिती मिळाल्यावर पर्वती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या दोन साथीदारांनी आपल्याला गेम करायचे आहे, असे सांगून बरोबर घेतले होते.
दरम्यान, तंबाखू व्यापारी लतेश सूरतवाला हे या घटनेत जखमी झाले होते. ही घटना घडल्यानंतर त्यांनी फिर्याद देताना यापूर्वी ९ जुलै रोजी स. प. महाविद्यालयामागील गल्लीत तिघांनी त्यांची दुचाकी अडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सूरतवाला यांनी पळ काढला होता. हे समजल्यावर विश्रामबाग पोलिसांकडून त्याचे सीसीटीव्ही फुटेज पर्वती पोलिसांना मिळाले. त्याचे निरीक्षण करताना हल्लेखोरांच्या दुचाकीवर आई असे लिहिलेले आढळून आले. त्या एका धाग्यावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सूरज वाघमोडे याला पकडले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक सुनील जगदाळे, अंमलदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे पाटील, प्रशांत शिंदे, किशोर वळे, अनिस तांबोळी, अमोल दबडे, अमित चिव्हे, सद्दाम शेख यांनी केली. पुढील तपास करण्यासाठी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.