तीन मुलांसह आईची आत्महत्या : पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 05:19 PM2019-07-29T17:19:16+5:302019-07-29T17:42:35+5:30
पोटच्या तीन मुलांना गळफास लावून महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
पिंपरी : पोटच्या तीन मुलांना गळफास लावून महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन अहवालातून ही बाब निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमा अक्रम बागवान (वय २८), फातिमा अक्रम बागवान (वय २८), मुलगी अलफिया अक्रम बागवान (वय ९), झोया अक्रम बागवान (वय ७), मुलगा जिआन अक्रम बागवान (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. यातील अलफिया आणि झोया या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. मुलींवर अत्याचार होत असल्यानेच त्यांची आई फातिमा हिने दोन्ही मुलींना तसेच मुलगा जिआन यालाही गळफास लावून स्वत: आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी फातिमा यांचा पती अक्रम बागवान याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत हकीकत अशी की, बागवान कुटुंब चार दिवसांपूर्वी कामाच्या शोधात भोसरी येथे आले. काम शोधण्यासाठी अक्रम बागवान रविवारी (दि. २८) सकाळी साडेदहाच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यानंतर घरात असलेल्या त्यांच्या पत्नी फातिमा यांनी घरातील छताच्या हुकाला तिन्ही मुलांना नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अक्रम बागवान दुपारी चारच्या सुमारास घरी आले. घर आतून बंद असल्याने त्यांनी बराच वेळ दार वाजवले. मात्र दार कुणीही उघडले नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला असता चौघांचे मृतदेह आढळले. त्यानंतर चौघांचे मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेनासाठी हलविण्यात आले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
बागवान यांनी भोसरी येथे आल्यानंतर एका शाळेत मुलांना प्रवेश घेतला. मुलगी अलफिया चौथीत, झोया दुसरीत आणि मुलगा जिआन पाहिलीत शिकत होते.