आईनेच नवजात मुलीला नदीत फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:08 AM2017-08-18T05:08:04+5:302017-08-18T05:08:04+5:30
रिक्षातील सहप्रवासी महिलेने आपले दहा दिवसांचे बाळ पळवून नेल्याचा आईने केलेला बनाव उघडकीस आला
पिंपरी (पुणे) : रिक्षातील सहप्रवासी महिलेने आपले दहा दिवसांचे बाळ पळवून नेल्याचा आईने केलेला बनाव उघडकीस आला असून मुलगी झाल्याच्या नैराश्यातून तिनेच बाळ नदीत फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी रेश्मा शेख (वय ४०) हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षातील सहप्रवासी महिलेने आपले बाळ पळवून नेले, अशी फिर्याद रेश्माने खडकी पोलिसांकडे बुधवारी दिली होती. मात्र, बाळ स्वत:च नदीत फेकून दिल्याची कबुली तिने चौकशीदरम्यान दिली. बाळाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रेश्माचा पती टेलरिंगचे काम करतो. मुलाची अपेक्षा असताना तिला मुलगी झाली. बुधवारी सकाळी दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने मोठी मुलगी आयशा हिच्यासोबत ती बाहेर पडली होती.