"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी", आईच्या आठवणीत उभारले स्मारक, भावंडांचा कौतुकास्पद निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 01:48 PM2023-04-10T13:48:40+5:302023-04-10T13:48:53+5:30
आईच्या निधनानंतर घरात आई नसल्याची उणीव या भावंडांना सतत जाणवायची मातेच्या प्रेमापोटी त्यांनी आईचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला
पुणे/किरण शिंदे : "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" अशी एक म्हण आहे.. आजवर आईसाठी अनेकांनी खूप काही केले. आईवर अनेक चित्रपट आहेत, गाणी आहेत, कविता आहेत. असं म्हणतात की आईच्या प्रेमाची उणीव कुणीही भरून काढू शकत आहे. त्यामुळे आईसाठी मुलं सतत काही ना काही करत राहतात. पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील दोन मुलांनी आईच्या पश्चात असं काही केले की आता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. या दोन मुलांनी आईच्या निधनानंतर थेट आईचे स्मारक बांधले.
भोर तालुक्यातील नांद गावातील सुनील दत्तात्रय गोळे आणि संतोष दत्तात्रय गोळे असं या दोघा भावंडांचे नाव आहे. सुनील हे शिक्षक तर संतोष हे मेकॅनिक आहेत. त्यांची आई राहीबाई गोळे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी कोरोना काळात निधन झाले होते. आईच्या निधनानंतर गोळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आई घरात नसल्याची उणीव या गोळी भावंडांना सतत जाणवायची. आणि आईवर असलेल्या प्रेमातून त्यांनी आईचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबातील इतर सदस्यांनीही पाठिंबा दिला.
या दोन्ही भावांनी मिळून घरासमोरच आईचे स्मारक तयार केले. आईचा हुबेहूब फायबरचा पुतळा तयार करून घेण्यात आला. त्यानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंगणात तयार करण्यात आलेल्या स्मारकात हा पुतळा स्थापन करण्यात आला. हा पुतळा स्थापन करतेवेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी होम हवन, महाप्रसाद, किर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रमही ठेवण्यात आले होते.
राहीबाई म्हणजे नांद गावातील लोकांचे आवडते व्यक्तिमत्त्व होते. मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशी त्यांची गावात ख्याती होती. पती दत्तात्रय गोळे यांच्यासोबत त्यांनी 45 वर्ष संसार केला. त्या काळात त्यांनी गावासाठी आणि गावातील लोकांच्या भल्यासाठी अनेकदा पुढाकार घेतला. त्यामुळे गावातील लोकांचाही त्यांच्यावर लोभ होता. त्यामुळे राहीबाई यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकामुळे गावातील लोकांनाही आनंद झाला आहे. भोर तालुक्यातील ग्रामस्थांनी गोळे कुटुंबाच्या या कृतीचे कौतुक केले.