मातृ सुरक्षा दिन : प्रसूती काळात माता दगावण्याच्या प्रमाणात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 02:15 PM2019-07-10T14:15:56+5:302019-07-10T14:19:20+5:30
प्रसूती कालावधीत मातांमध्ये वाढणारा उच्च रक्तदाब, रक्तस्त्राव, अँनिमिया या गोष्टी मातांच्या दगावण्याला कारणीभूत ठरत आहेत.
- नम्रता फडणीस
पुणे : प्रसूती म्हणजे एका नव्या जीवाला जन्म देणे. या काळात महिलांचा एकप्रकारे पुनर्जन्मच होतो असे म्हणतात. महापालिकेसह खासगी रूग्णालयांमध्ये प्रसूती मातांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असूनही, दरवर्षी माता दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेच्या हददीत 2018-2019 मध्ये 20 माता तर बाहेरगावहून रूग्णालयांमध्ये नोंद झालेल्या 94 अशाप्रकारे गतवर्षी 114 माता दगावल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. प्रसूती कालावधीत मातांमध्ये वाढणारा उच्च रक्तदाब, रक्तस्त्राव, अँनिमिया या गोष्टी मातांच्या दगावण्याला कारणीभूत ठरत आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत महापालिका आणि खासगी रूग्णालयांमध्ये जवळपास 60 हजार 150 प्रसूती झाल्या. यंदाच्या वर्षी बाहेर गावाहून रूग्णालयांमध्ये नोंद झालेल्या 14 माता तर महापालिका हददीतील 5 अशा एकूण 19 माता दगावल्याची नोंद झाली आहे. माता दगावण्याच्या कारणांमध्ये जखमेत पू होणे (1), हदयाचा आजार (1), टीबी, स्वाईन फ्ल्यू, न्युमोनिया सारखे तत्सम आजार (3) यांचा समावेश आहे.तर नोंदच होऊ न शकलेल्या कारणांची संख्या 8 आहे.
यासंदर्भात महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे ' लोकमत' शी बोलताना म्हणाल्या, प्रसूती काळात महिलांचा रक्तदाब मोठ्या प्रमाणावर वाढतो. काही महिलांना रक्तस्त्राव सुरू होतो. तर कुणाला अँनिमिया किंवा हदयाचा आजार असतो. काही मातांच्या प्रसूती काळातील गुंतागुतींच्या केसेस सोलापूर, नगर, कोल्हापूर सारख्या भागातून शहरातील रूग्णालयांमध्ये येतात. त्या मातांचे दगावण्याचे प्रमाण हे अधिक आहे. त्यातुलनेत महापालिका हद्दीमध्ये माता दगावण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पुण्यामध्ये बहुतांश प्रसूती या महापालिका किंवा खासगी रूग्णालयातच केल्या जातात. त्यामध्ये 8 ते 10 हजार प्रसूती या महापालिकेच्या रूग्णालयात होतात. महापालिकेने मातांचे मृत्यू टाळण्यासाठी ' माता अन्वेषण मृत्यू समिती' देखील काही वर्षांपूर्वी स्थापन केली आहे. दर महिन्याला महापालिका किंवा खासगी रूग्णालयात ज्या मातांचे मृत्यू होतील, त्याचे संपूर्ण रिपोर्टिंग समितीमार्फत केले जाते. प्रत्येक महिन्याला समितीची बैठक होते. प्रत्येक केसेसची शहानिशा केली जाते. तिनं नाव कुठं नोंदविल होतं? ती चेकअपला वेळच्या वेळी जात होती का? कुठल्या कारणानं माता दगावली? ते कसं टाळता येईल याचं निरीक्षण समिती नोंदविते आणि त्या निरीक्षणावर समितीकडून रूग्णालयांना सूचना दिल्या जातात. त्यामध्ये एएनसी मध्ये रक्तदाब पाहायला गेला पाहिजे. मातेला गरज असेल तर रूग्णालयात दाखल केले पाहिजे. ज्या मातांची प्रसूतीची मुदत जवळ आली असूनही डॉक्टरांना भेटायला येत नाहीत त्यांना फोन करून बोलवून घ्यावे. ज्या प्रसूतीमध्ये धोके अधिक आहेत. त्याकडे विशेष लक्ष द्यावे असे सूचित केले जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
----------------------------------------------------------
वर्ष प्रसूती काळात दगावणा-या प्रसूती काळात दगावणा-या
मातांची संख्या (बाहेरगावहून) मातांची संख्या
2016-17 49 19
2017-18 62 18
2018-19 94 20
2019-20 14 5