Pune Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने आईचे दात पाडले; वडिलांना ढकलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 01:07 PM2023-12-02T13:07:37+5:302023-12-02T13:08:14+5:30
हा प्रकार गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सम्राटनगर येथे घडला हाेता....
पुणे : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने वयोवृद्ध आईला बेदम मारहाण करून दात पाडून गंभीर जखमी केले. तसेच, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या वडिलांनाही ढकलून देत जखमी केले. हा प्रकार दापोडी येथे घडला. याप्रकरणी मद्यपी मुलावर गुन्हा दाखल करून खडकी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सम्राटनगर येथे घडला हाेता.
याप्रकरणी ऑगस्टिन जो डिसुजा (८३, रा. सम्राटनगर, बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डॉमनिक ऑगस्टिन डिसुजा (वय ४५, रा. प्लॉट नं. २४ सम्राटनगर, बोपोडी) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार, ऑगस्टिन डिसुजा हे पत्नी व आरोपी मुलगा एकत्र राहतात. आरोपी डॉमनिक याला दारूचे व्यसन आहे. गुरुवारी सायंकाळी त्याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. आईने नकार दिला असता मद्यपी मुलाने आईच्या तोंडावर बुक्की मारली. त्यावेळी ऑगस्टिन डिसुजा हे मध्ये पडले असता आरोपी मुलाने त्यांनादेखील शिवीगाळ करून ढकलून दिले. यात तेही जखमी झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ करत आहेत.